24 January 2020

News Flash

वाडे पडझडीचे सत्र सुरूच

रहिवाशांना नोटीस बजावूनही ते खाली केले जात नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

जुन्या नाशिक भागात वाडय़ाचा कोसळलेला भाग.    (छाया- यतीश भानू)

* सात वाडय़ांचा काही भाग कोसळला   ल्ल  सुमारे ४०० वाडे, इमारती धोकादायक * पोलीसबळाचा वापर करून वाडे रिकामे करणार

नाशिक : जुन्या नाशिक परिसरात वाडे पडझडीचे सत्र सुरूच असून गेल्या २४ तासांत सात वाडय़ांचा काही भाग कोसळण्याच्या, काहींच्या भिंती पडण्याच्या घटना घडल्या. धोकादायक अवस्थेतील वाडय़ांमधून रहिवाशांना या आधीच बाहेर काढल्याने या दुर्घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. शहरात सुमारे ४०० धोकादायक वाडे, इमारती असून ते रिक्त करण्याची नोटीस आधीच बजावली गेली आहे. मात्र वारंवार आवाहन करूनही रहिवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने पडण्याच्या स्थितीत असणारे वाडे पोलीस बळाचा वापर करून रिकामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जुन्या नाशिकमधील मधली होळी परिसरात सोमवारी रात्री मुंदडा, दीक्षित, भालेराव, लव्हाटे अशा चार वाडय़ांची पडझड झाली. हे सर्व वाडे एकमेकांलगत होते. जीर्ण अवस्थेतील वाडय़ाचा काही भाग कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन रहिवाशांना रात्री ११ वाजता बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर काही वेळातच एका वाडय़ाचा काही भाग कोसळला. आसपासच्या वाडय़ांना त्याचा फटका बसला. त्यांचीही पडझड झाली. या घटनेची माहिती समजल्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मंगळवारी वाडय़ांच्या भिंती कोसळणे, काही भाग कोसळण्याचे प्रकार घडले. तिवंधा चौक, मधली होळी, नाव दरवाजा परिसरात सात ते आठ वाडय़ांची पडझड झाल्याचे स्थानिक नगरसेवक शाहू खैरे यांनी सांगितले. रात्री ज्या भागात एकाच वेळी चार वाडय़ांची पडझड झाली, तेथील पंचाक्षरी आणि हिंगणे वाडाही धोकादायक स्थितीत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. शहरात पंचवटीमध्ये सर्वाधिक १५०, तर सातपूर विभागात सर्वात कमी म्हणजे १५ धोकादायक वाडे, इमारती आणि घरे आहेत. नाशिक पश्चिममध्ये १०३, नाशिकरोड ६७, नाशिक पूर्व ३९, सिडकोमध्ये २३ धोकादायक घरे, इमारती आहेत. रहिवाशांना नोटीस बजावूनही ते खाली केले जात नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मंगळवारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या परिसराची पाहणी केली. अशा घटनांमध्ये जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नोटीस बजावलेले कोणते वाडे अतिधोकादायक आहेत, त्यांची यादी तयारी करावी आणि हे वाडे रिकामे करण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी, असे निर्देश आयुक्तांनी दिल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

दुसरीकडे गावठाण भागातील वाडय़ांची दुरुस्ती, नूतनीकरण वा विकास करण्यात पूररेषा अडथळा ठरल्याकडे स्थानिक नागरिक लक्ष वेधत आहेत. निळ्या रेषेतील वाडे, जुनी घरे यांच्या दुरुस्तीला परवानगी मिळत नाही. यामुळे त्यांची दुरुस्ती करता येत नसल्याची तक्रार केली जात आहे. अनेक वाडय़ांमध्ये मालक-भाडेकरू वाद असून धोकादायक वाडे रिकामे न करण्यामागे ते महत्त्वाचे कारण ठरले.

घारपुरे घाट ते टाळकुटेश्वर मंदिरापर्यंत हजार ते बाराशेपैकी ३०० ते ३५० वाडय़ांची बिकट अवस्था आहे. गावठाण भागातील हे वाडे पूररेषेत दाखविले गेल्याने त्यांच्या दुरुस्तीला परवानगी मिळत नाही. महापालिका घरमालक-भाडेकरू वादाचे कारण पुढे करते. तथापि, जुन्या वाडय़ांच्या दुरुस्तीसाठी जादा चटईक्षेत्र देऊन गावठाण भागाचा विकास करण्याची गरज आहे. यामुळे घरमालक-भाडेकरू असे वादही राहणार नाहीत. दुरुस्तीअभावी वाडय़ांची पडझड होत आहे. १९६८ मधील विकास आराखडय़ात गावठाण म्हणून या भागाची नोंद झाली. हे क्षेत्र पूररेषेत धरता कामा नये. गावठाण भागाच्या विकासाला चालना देण्याची गरज आहे.

– शाहू खैरे, नगरसेवक

First Published on August 7, 2019 3:46 am

Web Title: around 400 tenements buildings in dangerous condition in nashik zws 70
Next Stories
1 चिखलमय परिसराची युद्धपातळीवर स्वच्छता
2 उपचाराअभावी तान्ह्य़ा बाळाचा मृत्यू
3 इगतपुरीतील भातशेती अतिपावसामुळे संकटात
Just Now!
X