News Flash

Coronavirus : जिल्ह्य़ात करोना रुग्ण ७०० च्या उंबरठय़ावर!

जिल्ह्य़ात करोना रुग्णांचा अहवाल ७०० च्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.

नाशिक : जिल्ह्य़ात करोनाचा पहिला रुग्ण सापडल्याच्या दीड महिन्यात (४६ दिवस) रुग्ण संख्या ७०० च्या जवळपास पोहचली आहे. रुग्ण दुप्पट होण्याच्या वेगाचे आकलन  चाचणी अहवाल मिळण्यास होणाऱ्या विलंबाने योग्य प्रकारे करता येत नसल्याची स्थिती आहे. बाधित रुग्णांच्या नोंदी ठेवल्या जातात. परंतु, यात महिला आणि पुरूषांच्या वर्गवारीविषयी आरोग्य विभागही अनभिज्ञ आहे. अवघ्या पाच ते १० दिवसांची बालकेही करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. एका प्रकरणात बाधित रुग्णाला घरी सोडल्याने जिल्हा रुग्णालय आणि मनपा आरोग्य विभागातील असमन्वय अधोरेखीत झाला.

टाळेबंदीला ५० दिवस पूर्ण होत असतांना या काळात काय काय घडले, याचा आढावा घेतल्यास करोना विरोधातील लढाईत नाशिक कुठे आहे ते लक्षात येते. जिल्ह्य़ात करोना रुग्णांचा अहवाल ७०० च्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. २९ मार्च रोजी जिल्ह्य़ात पहिला रुग्ण आढळला होता. लासलगाव येथे बेकरीत काम करणारा हा युवक कुठेही गेलेला नव्हता. त्यास संक्रमण कसे झाले, याचा थांगपत्ता अखेपर्यंत लागू शकला नाही. म्हणजे मार्चच्या अखेरीस एक असणारे रुग्णाचे प्रमाण दोन आठवडय़ात अर्थात १५ एप्रिल रोजी ४३ वर पोहचले. पुढील आठवडाभरात हे प्रमाण १२४ वर गेले. २८ एप्रिलला जिल्ह्य़ात १८१ करोनाचे रुग्ण होते.

दोन दिवसात यामध्ये १०० ने वाढ झाली. स्थानिक पातळीवर प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्यानंतर प्रलंबित अहवाल काहीअंशी लवकर मिळू लागले. परंतु, स्थानिक पातळीवर तपासणीची क्षमता कमी असल्याने जिल्ह्य़ातील अहवाल पुणे, धुळे आणि नागपुरलाही पाठविण्याची वेळ आली. एक मे रोजी २९९ असणारी रुग्णांची संख्या ११ दिवसांत ६८६ वर पोहोचल्याची सरकारी आकडेवारी आहे. म्हणजे आधीच्या ३० ते ३५ दिवसांत असणारी रुग्णसंख्या नंतरच्या ११ दिवसांत दुपटीहून अधिकने वाढल्याचे दिसून येते.

मालेगाव, नाशिकनंतर येवला तालुक्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. सिन्नर, दिंडोरी, नांदगाव, सटाणा, चांदवड, नाशिक, निफाड या तालुक्यांमध्येही रुग्ण आढळले. सध्या देवळा, इगतपुरी, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, पेठ, कळवण हे तालुके करोनामुक्त आहेत.

वयोवृध्दांपासून महिला तसेच पाच ते १० दिवसांच्या बालकांनाही करोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे.  मालेगावच्या चंदनपुरी येथील १० दिवसांची बालिका तर लासलगावच्या विंचूर येथील पाच दिवसाच्या बाळाचा अहवाल सकारात्मक आला. एकूण रुग्णांमध्ये महिला अधिक आहेत की पुरूष याबद्दल आरोग्य यंत्रणेला माहिती नाही. रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याची नोंद केली जाते. परंतु, एकत्रित आकडेवारी नसल्याचे या विभागाची प्रभारी जबाबदारी सांभाळणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले. तशीच स्थिती रुग्ण दुप्पट होण्याच्या वेगाची. अहवाल रडतखडत येत असल्याने त्याचे आकलन होत नाही. तसा अभ्यास अद्याप केला गेला नसल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले.

सद्यस्थिती काय ?

जिल्ह्य़ात मंगळवारी सायंकाळपर्यंत ६९६ रुग्ण आढळले असून त्यातील ७२ जण बरे होऊन घरी परतले. तर ३३ जणांचा मृत्यू झाला. सध्या ५९१ रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. यात नाशिक ग्रामीणमधील ८५, मालेगाव शहरातील ५५१ जणांचा समावेश आहे. येवल्यात ३१, जिल्ह्य़ाबाहेरील २१ रुग्ण आहेत. सिन्नर आणि दिंडोरी प्रत्येकी सहा, चांदवड चार, निफाड ११, नांदगाव तीन, सटाणा दोन, मालेगाव ग्रामीण १४, नाशिक ग्रामीण आठ अशी आकडेवारी आहे.

मालेगाव येथील करोनाग्रस्तांच्या संख्येत मंगळवारी सायंकाळपर्यंत तीनची भर पडली. यामुळे मालेगावमधील करोनाबाधित रुग्णांची संख्या आता ५५१ वर गेली आहे. धुळे येथील प्रयोगशाळेकडून सायंकाळी १८३ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १७७ अहवाल नकारात्मक असून तीन नमुने नाकारण्यात आले. तीन अहवाल सकारात्मक आले. यामध्ये २३ वर्षांचा हिंमत नगर येथील युवक, प्रकाश हौसिंग सोसायटीतील २३ वर्षांची युवती आणि जगताप गल्लीतील २२ वर्षांच्या युवकाचा समावेश आहे.

सावळागोंधळ

रुग्ण बरे झाल्याचे समजून घरी पाठवणे आणि नंतर अहवाल सकारात्मक आल्यावर पुन्हा त्याची शोधाशोध करणे यातून करोनाशी लढतांना जिल्हा रुग्णालय-मनपा वैद्यकीय विभागातील असन्वयावर शिक्कामोर्तब झाले आहे. नाशिकरोड परिसरातील फळविक्रेता बरा झाल्याचे समजून त्याला जिल्हा रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. हा रुग्ण घराच्या परिसरात आल्यावर त्याचे स्थानिकांनी उत्साहात स्वागत केले. दुसऱ्या दिवशी मात्र त्या रुग्णाचा अहवाल सकारात्मक आला आणि मनपाच्या वैद्यकीय विभागाने त्यास पुन्हा करोना कक्षात दाखल केले. ज्या बाधिताचा अहवाल आलेला नाही त्याला रुग्णालयातून सोडून देण्याचा प्रताप जिल्हा रुग्णालयात झाला. यात सकारात्मक रुग्ण नव्याने अनेकांशी संपर्कात आल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 3:35 am

Web Title: around 700 corona patients in the nashik district zws 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पाच हजारहून अधिक जणांवर दंडात्मक कारवाई 
2 ‘ई-लर्निग’द्वारे विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांची ओळख
3 गिरणाऱ्यात शेतकऱ्याचा खून
Just Now!
X