नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यातील किलबिलाट वाढणार

राज्यात यंदा सरासरीपेक्षा पाऊस जास्त झाला तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने झोडपले. नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य परिसरालाही पावसाचा दणका बसला. पावसामुळे अभयारण्यात पक्ष्यांसाठी आवश्यक खाद्यावर मर्यादा आली. पाऊस थांबल्यानंतर त्यात वाढ झाली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत या कालावधीत होणारे परदेशी पक्ष्यांचे आगमन यंदा उशिरा होत असून हळूहळू त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात डिसेंबरअखेरीस देश-विदेशांतील पक्ष्यांचे मोठय़ा प्रमाणावर आगमन होते. यंदा अतिवृष्टीमुळे पक्ष्यांच्या स्थलांतरावर परिणाम झाला आहे. डिसेंबरच्या सुरुवातीलाच येणारे पक्षी शेवटचा आठवडय़ात येण्यास सुरुवात झाली आहे. काही महिन्यांच्या पक्षी संख्येत तिप्पट वाढ झाली असली तरी मागील वर्षांच्या तुलनेत हा आकडा कमीच आहे. सध्या चापडगाव, मांजरगाव, खानगावथडी, कोठुरे, कुरूडगाव, काथरगाव या भागात पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे.

त्यात प्रामुख्याने शिकारी, रंगीत करकोचा, बदक, रोहित, गरुड, हळदी कुंकू, थापटय़ा, तरंग, चमचा, कुदळ्या, पाणकावळे, नदी सुराई, तितवाट या पक्ष्यांचा समावेश आहे. अभयारण्यातील पक्ष्यांची संख्या जानेवारीत अधिकच वाढण्याची शक्यता आहे. पक्षीदर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांचा काही दिवसांपासूनच्या ढगाळ वातावरणामुळे हिरमोड होत आहे. सकाळचे धुके आणि दिवसभर ढगाळ वातावरण यामुळे पक्षी दिसत नाहीत.  नाताळच्या सुट्टीनिमित्त या आठवडय़ात नांदूरमध्यमेश्वरला पर्यटकांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. पक्षीनिरीक्षणासाठी तसेच पक्ष्यांची रंगसंगती पाहण्यासाठी पर्यटकांनी दुपारच्या सुमारास यावे, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.