‘टाकाऊतून टिकाऊ’चा मंत्र; चिमुकल्यांमध्ये उत्साहाला उधाण, निर्मितीक्षमतेला वाव
‘सुट्टी आणि बच्चेकंपनीची धमाल’ हे समीकरण काही नवीन नाही. उन्हाळी सुटीनिमित्त क्रीडा, कला यासह विविध प्रकारच्या शिबिरांचे आयोजन होत असते. बच्चे कंपनीच्या सृजनतेला वाव मिळावा, यादृष्टीने नव्या कलाविष्कारांचा शोध घेतला जात आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठान बाल ग्रंथालय नाशिकरोड विभाग आणि ऋतुरंग परिवार यांच्यातर्फे आयोजित ‘टाकाऊतून टिकाऊ’ कार्यशाळा त्याचे एक उदाहरण. या वेळी कागदावरून विविध कलाकृती निर्मितीच्या छटा बच्चेकंपनी व पालकांना अनुभवता येतील.
उन्हाळी सुट्टी म्हटले की, पालकांसमोर सुट्टीचा सदुपयोग कसा करायचा, असा प्रश्न उभा ठाकतो. पालकांची ही अडचण लक्षात घेऊन अनेक संस्थांकडून नाटय़ शिबिरांपासून विविध कला आणि क्रीडांवर आधारित शिबिरांचे नियोजन केले जाते. मात्र पालक आणि मुले यांना एकत्रित घेत सृजनतेचा नवा आविष्कार घडविण्याचा प्रयोग कागद कलाकृती प्रात्यक्षिक कार्यशाळेद्वारे आकारास येत आहे. एरवी वर्तमान पत्राची रद्दी ही गृहिणींसाठी डोकेदुखी ठरते. महिन्याला भंगारवाल्याला देण्यात येणारी रद्दी, फडताळ्यात धूळ जमा होऊ नये म्हणून आच्छादन किंवा मुलांच्या वह्य़ा-पुस्तकांना कव्हर यापलीकडे त्याचा उपयोग ज्ञात नाही. मात्र रद्दी म्हणून टाकण्यात येणाऱ्या कागदाला योग्य आकार देत आकर्षक रंगसंगतीच्या साहाय्याने नव्या कलाकृती तयार होऊ शकतात याचा प्रत्यय मीना पाटणकर यांच्या कार्यशाळेत नाशिककरांना येणार आहे. वारली चित्रकला, टाकाऊतून टिकाऊ याचा योग्य मेळ साधत त्यांनी रद्दी कागदांपासून विविध उपयोग असलेल्या सुबक वस्तू तयार केल्या आहेत. त्यात सुंदर बाहुल्या, पेन स्टँड, पर्स यासह अनेकविध कलाकृतींचा समावेश आहे. कार्यशाळेचा विद्यार्थ्यांनी व पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी बाल ग्रंथालय नाशिक रोड विभाग समन्वयक तन्वी अमित (७७६९८ ८२९९९) यांच्याशी संपर्क साधावा.