News Flash

पर्यावरणस्नेही विसर्जनासाठी २९ ठिकाणी कृत्रिम तलाव

‘गोवर्धन’च्या नदीपात्रात विसर्जनास प्रतिबंध

गणेश विसर्जनासाठी महापालिकेने शहरात कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे.

पर्यावरणस्नेही गणपती विसर्जनासाठी महापालिकेने शहरातील वेगवेगळ्या विभागात २९ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करतानाच यंदा त्यातील पाणी ‘अमोनियम बायकाबरेनेट’ मिश्रित ठेवण्यात येणार आहे. तसेच गणेश भक्तांना ‘अमोनियम बायकाबरेनेट’ मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे. शहरातील विसर्जनाच्या ३० नैसर्गिक ठिकाणांवर पालिकेने आवश्यक ती तयारी पूर्णत्वास नेली आहे. दुसरीकडे या दिवशी शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची तयारी पोलिसांनी केली आहे.

गणरायाला निरोप देण्याचा क्षण समीप आला असताना विसर्जन पर्यावरणस्नेही पद्धतीने व्हावे यासाठी महापालिका, पोलीस, सामाजिक संस्था, महाविद्यालये अनेकांनी कंबर कसली आहे. गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून महापालिका मूर्ती संकलनाचा उपक्रम राबविते. हा उपक्रम यंदाही कायम राहणार आहे. शाडू मातीच्या मूर्तीप्रमाणे पीओपीच्या मूर्तीचे पर्यावरणस्नेही पद्धतीने विसर्जनाचा नवीन विचार पुढे आला. ‘अमोनियम बायकाबरेनेट’ बादलीतील पाण्यात मिसळून पीओपी मूर्तीचे विसर्जन करता येईल. यासाठी पुढाकार घेणाऱ्या गणेशभक्तांना पालिका ते उपलब्ध करणार आहे. या शिवाय, पालिकेने वेगवेगळ्या भागात विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची उपलब्धता केली आहे. या कृत्रिम तलावातील पाणी देखील ‘अमोनियम बायकाबरेनेट’ मिश्रित राहील. यामुळे गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी या कृत्रिम तलावाचा वापर करावा, असे आवाहन महापौर अशोक मुर्तडक यांनी केले. कृत्रिम तलावाची व्यवस्था सातपूर विभागात पाइपलाइन रोड, अशोकनगर, शिवाजीनगर, पश्चिम विभागात पंडित कॉलनीतील लायन्स क्लब हॉल, पंपिंग स्टेशन परिसरातील परिची बाग, वन विभाग नर्सरी पुलालगत गंगापूर रोड, महात्मानगर पाण्याच्या टाकीजवळ, येवलेकर मळ्यातील बॅडमिंटन हॉल, उंटवाडी पुलालगत म्हसोबा मंदिर, नवीन नाशिक विभागात डे-केअर स्कूल, राजेसंभाजी स्टेडिअम, न्यू ईरा स्कूल सामाजिक सभागृह, जिजाऊ वाचनालय, वालदेवी नदीघाट, पवननगर स्टेडिअम, नाशिकरोड विभागात महापालिका शाळा क्रमांक १२५, शिखरेवाडी मैदान, मनपा नर्सरी, नारायण बापूनगर, चेहेडी येथील मनपा क्रीडांगण, नाशिक पूर्व विभागात रामदास स्वामीनगर, साईनाथनगर, किशोरनगर, राणेनगर, पंचवटी विभागात रामवाडी जॉगिंग ट्रॅक, राजमाता मंगल कार्यालय, गोरक्षनगर, आरटीओ कार्यालय व कोणार्कनगर येथे करण्यात आली आहे.

सामाजिक संस्था व संघटनांच्या मदतीने गणेश विसर्जनाच्या ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी गणेशभक्तांनी मूर्तीचे संकलन करण्यात येणार आहे. मूर्ती संकलित करून त्यांचे विधिवत अन्यत्र विसर्जन करण्यात येणार असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. यामुळे गणेशभक्तांनी पर्यावरणस्नेही पद्धतीने विसर्जनाला प्राधान्य द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

‘गोवर्धन’च्या नदीपात्रात विसर्जनास प्रतिबंध

गोवर्धन शिवारातील गोदावरीचे नदीपात्र अतिशय उथळ आहे. त्यामुळे या परिसरातील नदीपात्रात गणेश विसर्जन न करण्याचा निर्णय बुधवारी नाशिकच्या तहसीलदार राजश्री अहिरराव-गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. गोवर्धन शिवारातील हॉटेल गंमतजंमतलगतच्या गोदावरी पात्रात गत वर्षी काहींनी मूर्तीचे विसर्जन केले होते. तथापि, गोवर्धन शिवारात नदीपात्र अतिशय उथळ असल्याने मूर्तीचे विसर्जन योग्य पद्धतीने होत नाही. ही बाब लक्षात घेऊन या परिसरातील नदीपात्रात विसर्जन न करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या परिसरात कोणी प्रवेश करू नये यासाठी गोवर्धन शिवारात आणि हॉटेल गंमतजंमत आणि आवश्यक त्या ठिकाणी लोखंडी जाळ्या उभारण्यात येणार असून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मार्गदर्शनपर फलकही लावण्यात येणार असल्याचे गांगुर्डे म्हणाले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2016 1:37 am

Web Title: artificial lakes for ganesh idols immersion
Next Stories
1 किल्लय़ांची चढाई,भटकंती आरोग्यासाठी उत्तम
2 समृद्धी विकास केंद्रांची ठिकाणे बदलण्याचा विचार
3 उत्पन्न जाहीर करण्याच्या योजनेत हप्त्याने कर भरण्याची सुविधा
Just Now!
X