‘भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची, उभी पंढरी आज नादावली, तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी, जिवाला तुझी आस लागली’ असा विठूरायाच्या नामाचा जप करत हजारो भाविकांनी शुक्रवारी शहर परिसरातील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली. दुसरीकडे भगवा ध्वज हाती घेत महिला वर्गासह भाविकांनी काढलेल्या दिंडीने परिसराची परिक्रमा पूर्ण करत सावळ्या विठूच्या दर्शनाची इच्छा पूर्ण केली. यानिमित्ताने विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईसह आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली, तसेच काही ठिकाणी संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले.

पावसाने उघडीप घेतल्याने पहाटेपासून भाविकांची पावले आपसूक विठ्ठल-रखुमाईच्या मंदिराकडे वळण्यास सुरुवात झाली. गोदाकाठावरील प्राचीन विठ्ठल मंदिरात भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली. अभिषेकानंतर विठुरायाला नवी वस्त्रे अर्पण करण्यात आली. नैवेद्य आरतीनंतर भाविकांच्या उत्साहाला उधाण आले. संताचे अभंग, हरिपाठ यामुळे परिसर चैतन्यमय झाला. जुन्या नाशिकमधील विठ्ठल मंदिरातही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी आठच्या सुमारास कॉलेज रोड येथील विठ्ठल मंदिर ते गंगापूर रोडवरील आकाशवाणी जवळचे विठ्ठल मंदिर या परिसरात कौमुदी संचालित महिला शाखेच्या वतीने दिंडी काढण्यात आली. या सोहळ्यास आ. सीमा हिरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महिला वारकरींनी ‘विठूचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला’ असे म्हणत फुगडय़ा, रिंगण, टाळ-चिपळ्यांच्या तालावर झेंडे, लेझीम हाती घेत पारंपरिक खेळ सादर केले. सातपूरच्या महादेववाडी, राज्य कर्मचारी वसाहतीमधील विठ्ठल मंदिर, नाशिकरोडच्या मुक्तीधामसह देवळाली गाव, जुने सिडको, सावतानगर यासह परिसरातील अन्य विठ्ठल मंदिरात आषाढीचे औचित्य साधत धार्मिक कार्यक्रमांसह अखंड नामसंकीर्तन, महाप्रसाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भक्त परिवाराच्या वतीने भाविकांना पिण्याचे पाणी, साबुदाण्याची खिचडी, केळी, लाडू असा फराळ देण्यात आला. बाबाज थिएटरतर्फे पंचवटी येथील निर्माण उपवन येथे ‘अभंगरंग’, शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभागाच्या वतीने धनंजय जोशी यांची शास्त्रीय आणि भक्तीसंगीत मैफल झाली.