१४ भजनी महिला मंडळांचा सहभाग

आषाढी एकादशीनिमित्त ऐन पावसाळ्यात रस्त्याच्या कडेने टाळ मृदुंगाचा गजर करत जाणारे वारकरी पाहिले की ‘देखिली पंढरी देही जनी-मनी एका जनार्दनी वारी करी’ या अभंगाची अनुभूती घ्यावीशी प्रत्येकालाच वाटते. वारीनिमित्त होणारे रिंगण, पारंपरिक खेळ आणि फुगडय़ांचा धरलेला ताल. सर्वानाच खुणावत असला तरी वारीतील ‘वारकरी’ होणे हे सर्वानाच जमते असे नाही. यासाठी येथील कौमुदी संचालित महिला संघाच्या प्रमुख सुनीता तळवेलकर यांनी पुढाकार घेत शहरात खास महिलांची ‘पायी वारी’ काढण्यास सुरुवात केली. यंदा वारीचे दुसरे वर्ष असून त्यात १५० हून अधिक महिला सहभागी होणार आहेत.

आषाढी एकादशी म्हटले की विठुनामाचा अखंड गजर.. त्याच्या सोबतीला असलेला टाळ-मृदुंगाचा नाद आणि वारकऱ्यांची भजने.. या वातावरणाचे गारूड आजही मराठी मनावर कायम आहे. मात्र कौटुंबिक अडचणी, आरोग्याच्या तक्रारी तर कधी प्रपंच यामुळे पंढरपूपर्यंत पायी जाणे हे सर्वानाच जमते असे नाही. विशेषत महिलांच्या मनातील ही सल बाजूला व्हावी, त्यांच्यात एकटय़ाने आपणास बाहेर पडता येते, वारीचा आपणही एक भाग होऊ शकतो हा आत्मविश्वास त्यांच्यात यावा यासाठी तळवळकर यांनी मागील वर्षांपासून त्यांच्या मार्गदर्शनाने सुरू असलेली १४ भजनी मंडळे एकत्रित करत ‘महिला वारी’ उपक्रमाची संकल्पना प्रत्यक्षात आणली. विशेष म्हणजे, यामध्ये ३५ ते ७८ वयोगटातील महिलांचा समावेश असून त्या सर्व वारीसाठी सक्रिय आहेत. महिलांच्या मूळ अडचणींचा अभ्यास करत कॉलेज रोड येथील विठ्ठल मंदिर ते गंगापूर रोडवरील आकाशवाणी केंद्राजवळचे विठ्ठल मंदिर या दरम्यान ही पायी वारी पूर्ण होते. वारीची प्रत्यक्ष अनुभूती महिलांना घेता यावी यासाठी बैठका घेत वारीत आपल्याला काय सादर करायचे आहे याची रंगीत तालीमही केली जाते.

वर्षभरात विठ्ठलाचे गायलेले अभंग, काही भक्तिगीते यांचा आधार घेत प्रत्येक मंडळ आपले गाणे निवडते आणि त्यावर नृत्य स्वतच बसवते. यासाठी रिंगणही भरते. वारीचा ‘इव्हेंट’ यशस्वी व्हावा, यासाठी एका मंडळावर नियोजनाची जबाबदारी देत प्रत्येक मंडळाला काही आर्थिक भार उचलण्याची तजवीज केली जाते. सर्व काही महिलांच्या हाती असल्याने नियोजनबद्ध काम सुरू राहते. यंदाही १५ जुलै रोजी सकाळी आठ वाजता आ. सीमा हिरे आणि काही मान्यवरांच्या उपस्थितीत वारीची सुरुवात होईल. वारीचा समारोप गंगापूर रस्त्यावरील विठ्ठल मंदिरात होणार आहे.

या वारीत नाशिककरांचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या विठ्ठल भजनाच्या गाण्यांवर महिला एकत्र आल्या असून दिंडीसाठी विठ्ठलाची पालखी सजविण्यात आली आहे. लेझीम, टिपऱ्या आणि झेंडे यांच्या साहाय्याने वारीत अनोखा नृत्याविष्कार पाहावयास मिळेल. यासाठी खास ‘ड्रेसकोड’ ठरविण्यात आला आहे. गंगापूर रस्त्यावरील शिवशक्ती मैदानात महिला रिंगण करणार असून त्या ठिकाणी अश्वही धावणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी हे पथक पालखीचे स्वागत करण्यासाठी सज्ज राहणार आहे.

महिलांमध्ये आत्मविश्वासासाठी

महिलांमध्ये अनेक सुप्त कला आहेत. मात्र काही अडचणींमुळे त्या पुढे येत नाही. भजनी मंडळातील महिलांना एकत्रित करत महिलांसाठी वारी सुरू करण्याचा हेतु हाच की त्यांनी एकत्र यावे. त्यांच्यातील कला गुणांचे दर्शन घडावे. यातील प्रत्येकीने या वारीसाठी स्वयंस्फुर्तीने जबाबदारी उचलली आहे आणि ती यशस्वीपणे पार पाडली. मंडळ सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टिने प्रयत्न करत असून अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

– सुनीता तळवेलकर (प्रमुख, कौमुदी संचालित महिला संघ)