नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे उद्या वितरण

नेचर क्लब ऑफ नाशिकच्या वतीने देण्यात येणाऱ्या पर्यावरणमित्र पुरस्कारासाठी यंदा येवला येथील वनपाल अशोक काळे यांची निवड करण्यात आली आहे. जागतिक पर्यावरण दिनी अर्थात ५ जून रोजी सकाळी ११ वाजता अंबड लिंक रोडवरील प्रबोधिनी वसतिगृहात आयोजित सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या वेळी निसर्गप्रेमींचाही सत्कार करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आ. प्रा. देवयानी फरांदे, मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील, पक्षिमित्र दिगंबर गाडगीळ, रजनी लिमये, माजी उपमहापौर अ‍ॅड. मनीष बस्ते आदी उपस्थित राहणार आहेत. क्लबच्या वतीने दर वर्षी पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा या पुरस्काराने येवल्यात काळवीट संवर्धनाचे काम करणाऱ्या काळे यांना हा पुरस्कार दिला जाणार असल्याचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा यांनी सांगितले. येवल्या जवळील काळविटांचे गाव म्हणून ओळख असलेल्या ममदापूर संवर्धन राखीव वन क्षेत्रात काळे वनपाल म्हणून कार्यरत आहे. २००६ मध्ये वन विभागात वनरक्षक म्हणून ते रुजू झाले.

काही तरी वेगळे करायचे या इच्छेने अस्वस्थ असलेल्या काळे यांची सहा वेळा बदली झाली आहे. वन विभागाने घेतलेल्या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळवत वनपाल पदापर्यंत बढती मिळवली. येवला तालुक्यातील राजापूर, ममदापूर आणि इतर ठिकाणी तब्बल दोन हजारांच्या आसपास काळवीट आहेत. त्यांची संख्या वाढवण्यासाठी काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे योगदान आहे. मानव आणि वन्य प्राण्यांमध्ये संघर्ष होऊ नये यासाठी त्यांचा जनजागृतीवर भर राहिला. वन्य प्राण्यांची पाण्यामुळे होणारी भटकंती पाहता त्यांनी जंगलात कृत्रिम तलाव निर्माण केला. एखादा प्राणी जखमी आढळल्यास त्याला वैद्यकीय उपचार मिळावे, यासाठी ते प्रयत्नशील असतात.

मोर, लांडगे, तरस आदी प्राण्यांना त्यांनी वाचवले आहे. त्यांच्या पत्नी योगिता या देखील वन विभागात कार्यरत असून दोघांनी वन संवर्धनाला प्राधान्य दिले आहे.

दरम्यान, पुरस्कार सोहळ्यानंतर उपस्थितांना पक्ष्यांच्या शाळेची अनोखी सफर घडविली जाईल. कार्यक्रमास पर्यावरणप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष प्रा. बोरा यांनी केले आहे.