एकाबाजूची वाहतूक सुरू न करताच दुसऱ्या बाजूचे खोदकाम

नाशिक : अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका स्मार्ट रस्त्याचे काम मुदतीत पूर्ण न केल्याने महापालिकेने ठेकेदाराला नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर गुरुवारी या मार्गावरील दुसऱ्या बाजूचे खोदकाम घाईघाईत सुरू करण्यात आले आहे. रस्त्याची एक बाजू खुली केली नसताना दुसऱ्या बाजूचे खोदकाम सुरू झाल्याने वाहनधारकांसमोरील अडचणीत भर पडली आहे. अरुंद भागातून पायी जातांना पादचाऱ्यांची कसरत होणार आहे. मेहेर ते सीबीएस या मार्गावरील एक बाजू चार ते पाच दिवसांत तसेच अशोक स्तंभ ते मेहेर दरम्यानची संपूर्ण एक बाजू खुली होण्यास १५ दिवस लागणार आहेत.

मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडीचे कारण ठरलेल्या स्मार्ट रस्त्याच्या कामाची एक बाजू ३१ जानेवारीपर्यंत वाहतुकीसाठी खुली करण्याची मुदत ठेकेदार पाळू शकला नाही. दुसऱ्या बाजूचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याची मुदत आहे. त्यात वाढ करण्यास पालिकेने आधीच नकार दिला आहे. स्मार्ट रस्त्याची एक बाजू खुली करण्यात अपयशी ठरलेल्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या पाश्र्वभूमीवर, पहिली बाजू पूर्ण करता न आलेल्या ठेकेदाराने दुसऱ्या बाजूचे काम हाती घेतले. मुळात या रस्ते कामामुळे मध्यवर्ती भागातील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. त्र्यंबक नाका- अशोक स्तंभ एकेरी वाहतूक आहे. अशोक स्तंभ-मेहेर सिग्नलकडून त्र्यंबक नाक्याकडे जाणारी वाहने रविवार कारंजा, शालिमारमार्गे वळविण्यात आली. मेहेर सिग्नल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या दुसऱ्या बाजूकडील निम्म्या भागातील रस्ता फोडण्यास सुरूवात झाली. तत्पुर्वी, लाल रंगाच्या लाकडी फळ्या उभारल्या गेल्या. आता बस किंवा तत्सम एखादे वाहन रस्त्यावरून जाऊ शकते. यामुळे अडचणींमध्ये अधिकच भर पडणार आहे.

अशोक स्तंभ ते सीबीएस चौक ही दुसरी बाजू खुली करून तेथून वाहतूक करता येईल. परंतु, मेहेर सिग्नल ते अशोक स्तंभ हा पट्टा अद्याप अपूर्ण आहे. मेहर सिग्नल ते सीबीएसचे काम झाले आहे. पण, तो वाहतुकीला खुला केलेला नाही. सीबीएस ते त्र्यंबक नाक्याची यापेक्षा वेगळी स्थिती नाही. ते काम अपूर्णच आहे. या स्थितीत प्रथम मेहेर ते सीबीएस मार्ग खुला केला जात आहे. त्यानंतर काही दिवसात अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका मार्गावरील एक बाजू खुली केली जाईल. ही नवीन मुदत पाळली जाते की नाही, याकडे वाहनधारकांचे लक्ष आहे.

मेहेर सिग्नल ते सीबीएस रस्त्याची एक बाजू पुढील चार ते पाच दिवसांत तसेच १५ दिवसांत अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका मार्गावरील एक बाजू वाहतुकीसाठी खुली केली जाणार आहे. स्मार्ट रस्त्याच्या कामाची ३१ मार्चपर्यंत मुदत आहे. ३० जानेवारीपर्यंत एक बाजू खुली करण्याची मुदत होती. ती न पाळल्याने ठेकेदाराला नोटीस बजावण्याची सूचना केली आहे. या कामास नव्याने मुदतवाढ दिली जाणार नाही.

-राधाकृष्ण गमे (आयुक्त, महापालिका)