News Flash

आश्रमशाळेतील विद्यार्थी अद्यापही रेनकोटविना

वसतीगृहातील भोजन व्यवस्थेतील त्रुटींबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होतात.

आश्रमशाळेतील लाखो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची वेळेवर उपलब्धता व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे दर्शविणाऱ्या आदिवासी विकास विभागाला पावसाळ्याच्या मध्यापर्यंत संबंधितांना रेनकोटही देता आले नसल्याचे समोर आले आहे. विलंबाने मिळणाऱ्या शैक्षणिक साहित्याचा विषय दर वर्षी गाजतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या वर्षी तसे घडू नये म्हणून खबरदारी घेतली जात असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, काही विषय आजही प्रलंबित असून रेनकोट हा त्यापैकीच एक. आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत काही ठिकाणी रेनकोट खरेदीसाठी निविदा प्रक्रिया झाली तर निम्म्याहून अधिक ठिकाणी ती प्रगतिपथावर आहे. हा सोपस्कार पार पडेपर्यंत ऑगस्ट महिना उजाडणार आहे. म्हणजे पावसाळा संपण्याच्या मार्गावर असताना रेनकोट हाती पडणार असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा कसा उपयोग होईल, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आदिवासी विकास विभागाचा कारभार, खरेदी प्रक्रियेतील कथित भ्रष्टाचार आदी कारणास्तव हा विभाग नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असतो. या विभागाच्या अनागोंदी कारभाराचा फटका अनेक वर्षांपासून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या विभागामार्फत राज्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागात ५५६ अनुदानित आश्रमशाळा चालविल्या जातात. त्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल दोन लाख ६५ हजार ३९८ इतकी आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण, निवास, भोजन व्यवस्था आदींचा संपूर्ण खर्च या विभागातर्फे केला जातो. वह्या-पुस्तके, कंपास, संचपुस्तिका व तत्सम साहित्य विलंबाने मिळत असल्याची ओरड दर वर्षी होते. वसतीगृहातील भोजन व्यवस्थेतील त्रुटींबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होतात.

यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून या प्रक्रियेतील विलंब टाळण्याचे आश्वासन खुद्द आदिवासी विकासमंत्र्यांनी दिले होते. त्या अनुषंगाने शैक्षणिक साहित्य, वसतीगृहातील भोजन व्यवस्था, दैनंदिन लागणारा भाजीपाला, केळी व तत्सम साधनांची पूर्तता वेळेतच होईल, याची दक्षता घेण्यात आल्याचे या विभागाचे आयुक्त राजीव जाधव यांनी नमूद केले.

साहित्य खरेदीच्या मुद्दय़ावर काही याचिका न्यायालयात दाखल आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया विहित वेळेत आणि पारदर्शकपणे राबविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे जाधव यांनी सूचित केले. साहित्य खरेदी प्रक्रियेचे विकेंद्रीकरण करण्यात आले. काही बाबी मुख्यालयाकडून तर काही बाबींची प्रक्रिया आदिवासी प्रकल्प कार्यालयांमार्फत राबविली जाते. त्यात रेनकोटचा विषय रेंगाळला आहे. निम्मा पावसाळा संपुष्टात येऊनही आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना रेनकोट मिळालेले नाहीत. काही प्रकल्प कार्यालयात निविदा प्रक्रिया राबविली गेली तर निम्म्याहून अधिक प्रकल्प कार्यालयात तिचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारणत: १५ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना रेनकोट दिले जातील असे सांगितले जाते. विलंबाने राबविल्या गेलेल्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना पावसाळ्याच्या अखेरीस हे रेनकोट हाती पडतील, अशी स्थिती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 1:31 am

Web Title: ashram school students still living without rainkote
Next Stories
1 महापालिका मुख्यालयात पर्यावरणप्रेमींचे आंदोलन
2 त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्राचीन मूर्ती बदलण्यावरून मतभेद
3 बेशिस्त वाहनधारक विद्यार्थ्यांविरोधात कारवाई