शिक्षकांकडे माध्यान्ह भोजनाचे काम का देण्यात आले, शासन गड-किल्ल्यांचे संवर्धन कसे करणार, शिष्यवृत्तीची रक्कम मिळत नसल्याने उद्भवणाऱ्या अडचणी, आरक्षण.. या संबंधी विद्यार्थ्यांकडून प्रश्नांची सरबत्ती झाल्यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रत्येकाचे उत्तर देऊन समाधान करण्याचा प्रयत्न केला.
गुरुवारी येथील मविप्र शिक्षण संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या विस्तारीत इमारत उद्घाटन सोहळ्यात तावडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी उपस्थित झालेल्या प्रश्नाला उत्तर देताना तावडे यांनी शिक्षकांकडील शैक्षणिक वगळता अन्य कामे कमी करण्याचे प्रयत्न केले जातील असे नमूद केले. गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम महाविद्यालयातील गटाकडे सोपविण्याचा विचार सुरू आहे. आरक्षण देण्यामागे समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळावी आणि त्यांचा विकास व्हावा हा उद्देश आहे. शिष्यवृत्ती वेळेवर न मिळाल्यास विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबणार नाही, अशा सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दहावीत एकही विद्यार्थी अनुत्तीर्ण राहू नये, असा प्रयत्न आहे. दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाईल. त्यातही अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून त्यांच्यातील कौशल्य शोधण्यात येईल. कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांचे जीवन घडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविणारे ज्ञान दिले जाणे गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या चांगल्या प्रयोगांना शासनाचा नेहमी पाठिंबा राहील. अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख करून देताना उत्तम योध्दा व व्यवस्थापनशास्त्राचे मार्गदर्शक म्हणून माहिती समाविष्ट केली जाणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. कार्यक्रमास आ. प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार आदी उपस्थित होते.