पंकजा मुंडे यांचा आशावाद

राज्याच्या ग्रामीण भागातील किशोरवयीन मुली आणि महिलांच्या आरोग्यावर मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेच्या पारंपरिक सवयी, समज-गैरसमज आणि अंधश्रद्धा यामुळे विपरीत परिणाम होत आहे. ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी सॅनिटरी नॅपकीनचा उपयोग केवळ १७ टक्के महिला करत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी ‘अस्मिता’ प्रयत्न करेल. नाशिक हा राज्यातील पहिला ‘अस्मिता’ जिल्हा असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

येथील इदगाह मैदानावर आयोजित अस्मिता मेळाव्यात मुंडे यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्यास राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, आ. सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुंडे यांनी अस्मिता योजनेची माहिती दिली. महिलांच्या आरोग्याचा संवेदनशीलरीत्या विचार करत ग्रामीण भागातील मुली, महिलांच्या आरोग्य, शिक्षण, रोजगाराचे चित्र बदलण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या वतीने अस्मिता योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत आतापर्यंत २५ लाखाहून अधिक निधी जमा झाला आहे.

महिलांना सॅनिटेरी नॅपकिनविषयी विचारणा, वापर याबाबत संकोच वाटत असल्याने अस्मिता अ‍ॅपच्या माध्यमातून त्याची नोंदणी, पैसे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील महिला आता खऱ्या अर्थाने ऑनलाइन व्यवहारात पारंगत होत असल्याचे मुंडे यांनी सांगितले. दुसरीकडे, बचत गटाच्या माध्यमातून अस्मिता पॅड तयार करणे यातून महिलांना रोजगाराची संधी मिळेल. मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी होईल.

सुमतीबाई सुकळीकर महिला उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून बचत गटांनी घेतलेल्या कर्जावरील व्याज सरकार भरणार आहे. यामुळेही महिलांचे उद्योगीय कौशल्य विकसित होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्यमंत्री भुसे यांनीही महिला बालकल्याणच्या विविध योजनांची माहिती दिली.

मुंडे यांच्या हस्ते मुलींना प्रातिनिधीक स्वरूपात अस्मिता कार्डचे वाटप करण्यात आले. आरोग्य विभागात उल्लेखनीय काम करणाऱ्या आरोग्यसेविकांचा, प्राथमिक आरोग्य केंद्राचा, ग्रामीण रुग्णालयाचा डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

उन्हाचा अनेकांना त्रास

राज्यातील पहिल्या अस्मिता मेळाव्यास जिल्ह्य़ातून प्रतिसाद लाभला.  किशोरवयीन मुलींनाही योजनेची माहिती व्हावी यासाठी जिल्हा परिषद शाळा, आश्रमशाळा, आदिवासी विकास विभागाच्या शाळांमधील मुलींना मेळाव्यास आणण्यात आले. मात्र कार्यक्रम उशिरा सुरू झाल्याने तत्पूर्वीच अनेकांनी काढता पाय घेतला. मेळाव्यास उपस्थितांना देण्यासाठी अल्पोपाहार म्हणून चिवडय़ाची व्यवस्था करण्यात आली होती. तोही अनेकांना मिळाला नाही. प्रशासनाला गर्दीचा अंदाज न आल्याने केलेला मंडप गर्दीसाठी अपुरा ठरला. मंडप परिसरात पंखा, कुलरची व्यवस्था करण्यात आली असली तरी ही गर्दी जेव्हा मंडपाच्या बाहेर जाऊ लागली. तेव्हा उन्हाचा त्रास आणि भुकेची जाणीव यामुळे अनेकांना अस्वस्थ वाटू लागले. काहींना भोवळ आली. तेथे उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेत त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.