|| अनिकेत साठे

संजय राऊत यांच्या दौऱ्यात समन्वयाचा प्रयत्न

नाशिक : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली. राज्यात सत्ता हस्तगत करताना महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला. पण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तो राबविणे तितके सोपे नसल्याची प्रचिती आघाडीतील तिन्ही पक्षांना येत आहे. सत्तेच्या प्रभावाने पक्षाला बळकटी देण्याचा प्रयत्न इतरांप्रमाणेच शिवसेना करीत आहे. स्थानिक पातळीवर काँग्रेसला वगळून राष्ट्रवादीशी जुळवून घेता येईल का, याची चाचपणी केली जात आहे. भाजप आयारामांना सामावताना निष्ठावंतांना जपण्याचे जे कौशल्य दाखविते, ते मात्र सेनेला अवगत झालेले नाही. त्यामुळेच खासदार संजय राऊत यांच्या उत्तर महाराष्ट्रातील दौऱ्यात जळगावमध्ये गटबाजीचे उघड दर्शन घडले. अंतर्गत धुमसणारे वाद पक्षाला तापदायक ठरणार आहेत.

राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर सेनेच्या वरिष्ठ नेत्याने उत्तर महाराष्ट्रात केलेला हा पहिलाच राजकीय दौरा. एरवी, राऊत हे नाशिकला वारंवार येतात. परंतु, उत्तर महाराष्ट्रातील अन्य भागास त्यांनी फारशी भेट दिलेली नव्हती. भाजपसमवेत सत्तेत असताना ते पक्ष कार्यालय वा विश्रामगृहातच पदाधिकाऱ्यांची बैठक घ्यायचे. पत्रकारांशी संवाद साधायचे.

महापालिकेतील चमत्काराने जळगावने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दौऱ्यात राऊत यांनी जळगावमध्ये नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. पण, तिच्याकडे भाजपच्या बंडखोरांसह नवग्रह मंडळाचे सदस्य आणि इतकेच नव्हे तर, काही निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. भाजपचे ३३ नगरसेवक सेनेत दाखल झाल्यानंतर शिवसेनेत तीन गट तयार झाले आहेत. संजय राऊत, संजय सावंत आणि एकनाथ शिंदे यांना मानणारे हे ते गट.

नियुक्त्यांवरून वाद

पक्षात दुफळी माजण्यास अलीकडेच झालेल्या संघटनात्मक नियुक्त्यांनी हातभार लावला. इतर पक्षातून आलेल्या विष्णू भंगाळे यांच्यावर जळगाव शहरची जबाबदारी सोपविली गेली. पारोळ्यातील डॉ. हर्षल माने यांची नियुक्ती आमदार चिमणराव पाटलांना रुचलेली नाही. या नियुक्त्यांनी कुरघोडीचे राजकारण सुरू झाले. महापालिकेत सत्तांतर घडवून आणण्यात एका गटाने महत्वाची भूमिका बजावली. तर दुसऱ्या गटास जाणीवपूर्वक अनभिज्ञ ठेवले गेले. सत्तेचे समीकरण जुळवून आणणाऱ्या काही जुन्या निष्ठावंतांना संघटनात्मक महत्वाची पदे देताना डावलले गेले. संपर्कप्रमुख विश्वासात घेत नसल्याची खदखद भाजपमधून सेनेत आलेले नगरसेवक व्यक्त करतात. सेनेतील अस्वस्थतेची छाया राऊत यांच्या दौऱ्यावर प्रकर्षाने अधोरेखीत झाली.

धुळे जिल्ह्यात भाजपने हातपाय पसरले आहेत. दौऱ्यात पहिलीच भेट राऊत यांनी धुळ्याला दिली. शिवसेनेची शहर, ग्रामीण भागात ताकद आहे. पण निवडणुकीत यश मिळत नाही. धुळे महापालिकेची स्थापना झाल्यानंतर भगवान करनकाळ यांच्या माध्यमातून सेनेचा पहिला महापौर निवडला गेला होता. पुढील काळात पक्षाची घसरण झाली. आज महापालिकेत सेनेचा एकमेव नगरसेवक आहे. सेनेचे माजी आमदार शरद पाटील यांनी काँग्रेसची वाट धरली. संघटनेत शिथीलता येऊ नये म्हणून हा दौरा होता. करोना काळात कुणाला भेटता आले नाही. यानिमित्ताने भेटीगाठी झाल्या. स्थानिक स्वराज्य निवडणुका स्वबळावर लढविण्याबाबत काँग्रेस आग्रही आहे. अशावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित मैदानात उतरण्याचे संके त राऊत यांनी दिल्याने स्थानिक पातळीवर त्या दिशेने  मोर्चेबांधणी केली जाऊ शकते.

नंदुरबारमध्ये काँग्रेसचे नेते, आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्यावर राऊत यांनी टिकास्त्र सोडले. नंदुरबारच्या बैठकीत शिवसैनिकांनी आदिवासी विकास मंत्री पाडवी यांच्या विरोधात तक्रारींचा पाढा वाचला होता. पाडवी यांनी नंदुरबारमधील शिवसैनिकांविरुध्द संघर्ष करण्याऐवजी हा संघर्ष जिल्ह्याच्या विकास कामांसाठी करावा, शिवसेना हे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या मागे उभी राहील, असा सल्ला त्यांनी दिला. अखेरच्या टप्प्यात राऊत यांनी नाशिकमधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. करोनाचे नियम बाजूला ठेऊन ही बैठक झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन हेवेदावे बाजूला ठेऊन काम करण्याचा सल्ला त्यांना द्यावा लागला. जळगावप्रमाणे नाशिकमध्येही तशीच धुसफूस असल्याची त्यांना जाणीव होती. निवडणुकीच्या दृष्टीकोनातून कानमंत्र देताना महापालिकेत स्वबळाचा नारा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांनाही राऊत यांनी चुचकारले. भुजबळांना सेनेतील नवा प्रवाह माहिती नसल्याची जाणीव राऊत यांनी करुन दिली. भविष्यात मित्रपक्षांशी जुळवून घेताना, पक्षांतर्गत खदखद शमविताना सेनेची कसोटी लागणार आहे.