पोलिसांकडेच लाचेची मागणी, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये खळबळ

नाशिक : व्हिसेरा अहवाल देण्यासाठी पोलिसाकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे सहाय्यक संचालक आमसिध्द पांढरेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रयोगशाळेतील अधिकारी पोलिसांना त्रास देतात. त्यांना चांगली वागणूक देत नाहीत. वारंवार खेटे मारायला लावतात. अशा तक्रारी होत असताना प्रयोगशाळेतील प्रथम वर्गाचा अधिकारी पोलीस कर्मचाऱ्याकडून लाच घेत असल्याचे या कारवाईतून उघड झाल्याने सर्वाना धक्का बसला आहे.

सोमवारी दुपारी दिंडोरी रस्त्यावरील न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत ही कारवाई करण्यात आली. प्रयोगशाळेत विषशास्त्र विभागात पांढरे कार्यरत आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्हिसेरा अहवाल तपासणीसाठी त्यांच्याकडे पाठविण्यात आला होता. पाच वेळा चकरा मारूनही पोलीस कर्मचाऱ्यास अहवाल दिला गेला नाही. अहवाल लवकर द्यावा, यासाठी वरिष्ठांनी प्रयोगशाळेस पत्र पाठविल्याचे सांगितले जाते. अनेकदा चकरा मारूनही पांढरे यांनी दाद दिली नाही. व्हिसेऱ्याचा अहवाल देण्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली. तडजोडीअंती १० हजाराची रक्कम ठरली.

प्रयोगशाळेकडून मिळणाऱ्या वागणुकीला वैतागलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्र रीची शहानिशा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. प्रयोगशाळेत सोमवारी दुपारी ही रक्कम स्वीकारत असताना सहाय्यक संचालक पांढरेला रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक सुनील कडासने यांनी दिली.

या कारवाईमुळे प्रयोगशाळेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गृह विभागाच्या अखत्यारीतील न्याय सहाय्यक प्रयोगशाळेचे अधिकारीच पोलिसांकडून लाचेची मागणी करीत असल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक आहे. संशयित पांढरे हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील उसूर येथील आहे. सध्या तो दिंडोरी रस्त्यावरील अमरदीप सोसायटीत वास्तव्यास आहे. त्याच्याविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, दिंडोरी रस्त्यावरील न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत विविध गुन्ह्यांशी संबंधित वस्तु, रासायनिक पदार्थ, व्हिसेरा आदी तपासणीसाठी पाठविल्या जातात. नाशिक विभागीय स्तरावरील प्रयोगशाळेत नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यातील पोलिसांकडून नमुने पाठविले जातात. तपासात प्रयोगशाळेचा अहवाल महत्वाचा असतो. तथापि, प्रयोगशाळेच्या कार्यपध्दतीला पोलीस कर्मचारी त्रस्त झाल्याची माहिती उघड होत आहे.

अहवाल लवकर न देण्याचे प्रकार घडत असतात. पोलीस कर्मचाऱ्यांना वारंवार खेटा मारायला लावणे, त्यांना चांगली वागणूक न देणे असे अनेक प्रकार प्रयोगशाळेतील अधिकाऱ्यांकडून घडत असल्याची तक्रार पोलीस वर्तुळातून होत आहे. लाचखोरीचे जाळे कु ठे कु ठे पसरले आहे, ते यावरून दिसत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लाचखोरीविरोधात पुढे येण्याचे आवाहन वारंवार नागरिकांना के ले जाते.