येथील महापालिका मालकीच्या भाडे तत्त्वावर दिलेल्या तीन व्यापारी गाळ्यांच्या अनामतीची चार लाख ७५ हजाराची रक्कम बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर हडप केल्याप्रकरणी प्रभारी साहाय्यक कर आयुक्त शमशुद्दीन शेख उमर यांना आयुक्त किशोर बोर्डे यांनी निलंबित केले आहे.
२००३ मध्ये मच्छीबाजार भागात पालिका प्रशासनाने तीन गाळे व्यापाऱ्यांना भाडे तत्त्वावर दिले होते. त्यापोटी तिघा व्यापाऱ्यांद्वारे पावणे पाच लाखाची अनामत पालिकेकडे जमा करण्यात आली होती. आता या गाळ्यांच्या जागेवर ‘बीओटी’ तत्त्वावर संकुल उभे करण्यासाठी हे गाळे पाडण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतल्याने संबंधित गाळेधारकांनी भरलेली अनामत रक्कम परत मिळण्यासाठी अर्ज केले. पालिकेच्या संकीर्ण कर विभागाने या अर्जाप्रमाणे संबंधितांची अनामत रक्कम परत देण्यासाठी लेखा विभागास शिफारस केली. मात्र या विभागाने केलेल्या छाननीत २०११ मध्येच अनामतीची ही रक्कम दिल्याचे आढळून आले. आयुक्त बोर्डे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्य लेखा परीक्षक अतुल गायकवाड यांच्याकरवी चौकशी सुरू केली.
या चौकशीत सध्या साहाय्यक कर आयुक्त असलेले आणि २०११ मध्ये संकीर्ण कर विभागात अधीक्षक असलेल्या समशुद्दिन शेख यांनी बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने ही रक्कम हडप केल्याचे सकृद्दर्शनी आढळून आले.