News Flash

अंधांच्या जीवनात स्वरांचा प्रकाश

अलवार सुरांच्या मैफलीत सारेच नकळत दंग होत एका वेगळ्या भावविश्वात गुंग होतात.

‘नॅब’चा सूरदृष्टी वाद्यवृंद
जीवनात संगीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अलवार सुरांच्या मैफलीत सारेच नकळत दंग होत एका वेगळ्या भावविश्वात गुंग होतात. मात्र ज्यांचे विश्वच अंधारलेले आहे, अशांनाही या स्वरांची अनुभूती मिळावी, यासाठी एक अनोखा उपक्रम सुरू झाला आहे. नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाइंड (नॅब)च्या पुढाकारातून सुरू झालेल्या संगीतविषयक वर्गाच्या माध्यमातून निर्माण झालेला ‘सूरदृष्टी वाद्यवृंद’ सध्या चर्चेत आहे. अंधत्व, बहुविकलांगत्व यावर मात करत विद्यार्थ्यांनी गायन, वादन कला आत्मसात करत कलाक्षेत्रात कलावंत म्हणून स्वतंत्र ठसा उमटविण्याची धडपड चालविली आहे.

कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेतून ‘तिमिरातूनी तेजाकडे’चे दान मागितले खरे, पण भौतिकदृष्टय़ा ज्यांना हे शक्य नाही, अशा अंध बांधवांची दैनंदिन आयुष्यात विविध पातळीवर कुचंबणाच होते. आपल्या व्यंगाविषयी दुसऱ्यांची सहानुभूती नाकारत अनेकांनी वेगळी वाट निवडून त्यात काही यशस्वी झाले. मात्र जे अजूनही मुख्य प्रवाहापासून दूर आहेत, अशा वंचितांसाठी नॅबतर्फे गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर संगीतविषयक प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले. वर्गात ३० हून अधिक अंध, अपंग, दृष्टिदोष यासह बहुविकलांग असणाऱ्या विद्यार्थ्यांनी कलेची साधना करण्यास सुरुवात केली. संगीत शिक्षिका पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी हे पाठ गिरवू लागले. वर्गात सध्या २२ मुली आणि १४ मुले शिक्षण घेत आहेत. आठवडय़ातील दर गुरुवार आणि शनिवार या दिवशी नॅब कार्यालयात हे वर्ग चालतात. विद्यार्थ्यांना गायनात शास्त्रीय तसेच सुगम संगीत, तर वादनात कॅसिओ, हार्मोनिअम आणि तबला वाद्य वादन शिकवले जाते.

विद्यार्थी त्यात तरबेज होत असताना त्यांना जाहीर कार्यक्रमाचा अनुभव मिळावा यासाठी संस्थेच्या सहकार्याने एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना आत्मविश्वास तर दिलाच, पण पुढील वाटचालीसाठी एक दिशाही मिळाली. या जाहीर कार्यक्रमामुळे त्यांना पुढील महिन्यातील दोन कार्यक्रमांचे आमंत्रण मिळाले. यातील एक कार्यक्रम नाशिकमध्ये, तर दुसरा धुळे येथे होणार आहे.जाहीर कार्यक्रमातून मिळणारे मानधन नॅब त्या कलावंतांना समप्रमाणात देणार असून उर्वरित रकमेतून ‘अंध अपंग कल्याण’ निधीत भर घालण्यात येणार आहे. या निधीचा विनियोग अंध-अपंगासाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण वर्ग, त्यांना आवश्यक साहित्य व साधने तसेच आर्थिकदृष्टय़ा त्यांच्या पुनर्वसनासाठी केला जाणार आहे. याशिवाय लवकरच अखिल भारतीय गांधर्व मंडळाच्या परीक्षेला बसविण्यात येणार असून कलावंत म्हणून त्यांची ओळख व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी नॅब कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2015 4:07 am

Web Title: association for blind start music classes for blind
Next Stories
1 नाशिकमध्ये भाजपविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसला नवीन बळ
2 चोरटय़ांची दिवाळी
3 बोलेरो गाडी लंपास
Just Now!
X