News Flash

अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी रामकुंडात विसर्जित

भाजपच्या वतीने वाजपेयी यांच्या अस्थींचे देशभरातील प्रमुख नद्यांमध्ये विसर्जन करण्यात येत आहे.

नाशिक येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थीकलश यात्रेत सहभागी राजकीय नेते, विद्यार्थी.

यात्रेत कार्यकर्ते नसल्याने धावाधाव

माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे शुक्रवारी सकाळी गोदावरीत विसर्जन करण्यात आले. यावेळी वाजपेयी यांना निरोप देण्यासाठी भाजपशी संबंधित नेते, पदाधिकाऱ्यांसह इतर नागरिक सहभागी झाले होते. गर्दी वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात आला होता.

भाजपच्या वतीने वाजपेयी यांच्या अस्थींचे देशभरातील प्रमुख नद्यांमध्ये विसर्जन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई येथून वाजपेयींचा अस्थीकलश नाशिक येथे आणण्यात आला. वाजपेयी यांच्या अंत्यविधीला दिल्ली येथे अथांग जनसागर लोटला होता, परंतु इच्छा असूनही ज्यांना अंत्ययात्रेत सहभागी होता आले नाही, अशा लोकांना त्यांच्या अस्थीकलशाचे दर्शन घेता यावे म्हणून भाजपच्या महानगर कार्यालयात गुरुवारी अस्थीकलश ठेवण्यात आला होता. भाजप पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी अस्थींचे दर्शन घेतले.

शुक्रवारी सकाळी पक्षाच्या वसंत स्मृती कार्यालयापासून सजविलेल्या वाहनात अस्थीकलश ठेवून यात्रा काढण्यात आली. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, शहराध्यक्ष बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे या आमदारांसह महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शहर परिसरात ठिकठिकाणी कलश यात्रा रथावर नागरिकांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली. रामकुंडावर अस्थीकलशचे पूजन आणि पौरोहित्य सतीश शुक्ल, पंचाक्षरी यांनी केले. दीड तास विधीवत पूजनानंतर वाजपेयी यांचा अस्थीकलश रामकुंडात विसर्जित करण्यात आला. यावेळी पालकमंत्री महाजन यांच्या समवेत संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पशु संवर्धन मंत्री महादेव जानकर, खा. हरिश्चंद्र चव्हाण, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते आदी उपस्थित होते.

गर्दीसाठी विद्यार्थ्यांचा सहभाग

अस्थीकलश यात्रेत प्रारंभी भाजप पदाधिकारी वगळता कार्यकर्ते नसल्याने उपस्थितीवर परिणाम जाणवला. काही लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी धावपळ करून गर्दी जमविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एका आमदाराने तातडीने जवळच्या महाविद्यालयास भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांना अस्थीकलश यात्रेत सहभागी करून घेतले. ऐनवेळच्या या विषयाने विद्यार्थ्यांना दप्तरासह सामील व्हावे लागले. आपणांस अचानक या यात्रेसाठी आणण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनीच नमूद केले. विद्यार्थ्यांच्या सहभागाने बऱ्यापैकी गर्दी दिसून लागल्यावर यात्रा शहर परिसरातून निघून अहिल्यादेवी होळकर पूलमार्गे गोदावरी येथील रामकुंड परिसरात पोहचली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 2:49 am

Web Title: atal bihari vajpayees bone is immersed in ramkunda
Next Stories
1 ‘उन्नती’च्या विद्यार्थिनींकडून पर्यावरणपूरक राख्यांची निर्मिती
2 मानसिकता बदलल्यास अपघातांचे प्रमाण कमी होणे शक्य
3 खाऊच्या पैशातून राख्यांची निर्मिती
Just Now!
X