बँकांच्या अनास्थेचा चोरटय़ांकडून गैरफायदा; शहरातही एटीएम यंत्र फोडण्याचा प्रयत्न

शहरासह जिल्ह्य़ात बँकांच्या अनास्थेमुळे एटीएम यंत्रामधून रक्कम चोरीचे प्रकार दिवसागणिक वाढत आहे. अनेक बँकांनी खबरदारीचा उपाय म्हणून एटीएमचा विमा उतरविला आहे, त्यामुळे तिथे सुरक्षारक्षक नेमण्याबाबत उदासीनता दाखवत आहेत. याचा गैरफायदा चोरटय़ांकडून घेतला जात असल्याचा आक्षेप पोलिसांनी नोंदविला आहे. सटाणा शहरात एटीएम यंत्र फोडून झालेल्या चोरीच्या घटनेला चोवीस तास होण्यापूर्वीच नाशिक शहरातील शरणपूर रस्त्यावर चोरटय़ांनी एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने पोलिसांनी चोरटय़ांना अटक केली.

सटाणा येथे एटीएम यंत्र फोडून चोरटय़ांनी २३ लाख रुपयांहून अधिकची रोकड लंपास केली होती. त्या पाठोपाठ गुरुवारी रात्री नाशिक शहरातील कुलकर्णी गार्डनलगतच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम यंत्रही फोडण्याचा प्रयत्न झाला. बँकेत नोकरीस असलेला तसेच दिंडोरी येथे रुग्णालयातील कर्मचारी संशयित अमित गवई (२४) आणि किरण मोरे (२२) यांनी एटीएम हेरत ते फोडून रोकड लंपास करण्याचा डाव रचला होता. दोघेही संशयित मध्यवर्गीय कुटुंबातील असून उच्चशिक्षित आहे. झटपट श्रीमंत होणे आणि काही तरी वेगळे करण्याच्या इच्छेने त्यांनी एटीएम यंत्र फोडण्याचे ठरवले. त्यासाठी ‘यू टय़ूब’वर एटीएम कसे फोडतात याची माहिती मिळविली. त्यानुसार बाजारातून छन्नी, कटावणी, हातोडा आदी साहित्य खरेदी केले. गुरुवारी रात्री शांतता झाल्यावर संशयित दुचाकीवरून एटीएम केंद्रावर गेले. आपले वाहन कोणाच्या लक्षात येऊ नये यासाठी त्यांनी पल्सरच्या क्रमांकावर चिकटपट्टी लावण्याची काळजी घेतली. आसपास कोणी नाही हे पाहत त्यांनी केंद्रात जाऊन एटीएम यंत्र फोडण्यास सुरुवात केली. रात्रीच्या शांततेत हा आवाज ऐकून ही बाब कोणीतरी पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस येत असल्याचे पाहून संशयित अंधाराच्या दिशेने पळाले. पोलिसांनी पाठलाग करत त्यांना पकडले. एटीएम केंद्राची पाहणी केली असता एका यंत्राचा पुढील भाग चोरटय़ांनी पूर्णपणे तोडल्याचे निदर्शनास आले. त्यांना रोकड बाहेर काढता आली नाही. संशयितांनी गुन्ह्य़ाची कबुली दिल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यू टय़ूबवरून धडे

एटीएम केंद्रातील रक्कम काढण्यासाठी संशयितांनी चोरी कशी करायची याचे तंत्र शिकण्यासाठी ‘यू टय़ूब’ची निवड केली. बँकेचे एटीएम कसे फोडतात, त्यासाठी लागणारी सामग्री याची माहिती त्यांनी यू टय़ूबवरून मिळविल्याचे उघड झाले आहे. त्याआधारे त्यांनी साहित्य खरेदी करून रोकड लंपास करण्याचा डाव आखला होता.

अनेक एटीएम केंद्र सुरक्षेविना

पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी एटीएम केंद्रांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली. बँकेचे अधिकारी एटीएमचा विमा उतरवितात. आणि केंद्राच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करतात. शहरातील बहुतांश एटीएम केंद्रावर सीसी टीव्ही असूनही ते बंद असतात. कित्येक ठिकाणी सुरक्षारक्षक नाहीत. या स्थितीचा फायदा चोरटे घेत असल्याचे कोल्हे यांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वी एटीएम फोडण्याचे प्रयत्न शहरात झाले आहेत. त्यावेळी पोलिसांनी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन एटीएमच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याची सूचना केली होती, परंतु बहुतांश बँक सुरक्षारक्षकांवर अधिकचा खर्च करण्यास तयार नसल्याचे दिसून येते. काही निवडक केंद्र वगळता अनेक एटीएम सुरक्षारक्षकाविना आहेत.