खंडणी न दिल्याच्या कारणावरून शिवसेनेचे महानगर समन्वयक व माजी नगरसेवक दिलीप दातीर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी पोलिसांनी अट्टल गुन्हेगार प्रणव बोरसे याच्यासह तीन जणांना अटक केली. संशयितांकडून पिस्तूल व पाच जिवंत काडतुसे तसेच नवीकोरी स्विफ्ट मोटार हस्तगत करण्यात आली आहे. संशयितांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात अटक झालेल्या संशयितांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. शुक्रवारी सायंकाळी अंबड परिसरातील माऊली लॉन्ससमोर ही घटना घडली. दातीर औषध दुकानाजवळ थांबले असताना संशयित प्रणव बोरसे, बाळा कापडणीस व दीपक निकम तिथे पोहचले. संशयितांनी मध्यंतरी दातीर यांच्याकडे एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. त्यास त्यांनी नकार दिल्याचा राग धरून संशयितांनी तीक्ष्ण हत्याराने हल्ला चढविला.

दातीर यांच्या मोटारीवर दगडफेक करण्यात आली. या वेळी प्रणवने त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला. या घटनाक्रमात हल्ला चुकविल्याने दातीर यांना दुखापत झाली नाही. गोंधळाच्या स्थितीचा फायदा घेऊन संशयित पसार झाले. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करत संशयितांचा युद्धपातळीवर शोध सुरू केला. मध्यरात्री सराईत गुन्हेगार प्रणव बोरसेसह कापडणीस व निकमला पाथर्डी फाटा परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

त्यांच्याकडून एक पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, कोयता, नवी स्विफ्ट मोटार जप्त करण्यात आली. प्रणव बोरसेवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात २४ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. शनिवारी तिन्ही संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची दोन दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.