नाशिक : टाळेबंदीमुळे घरात अडकलेल्या व्यक्तींमुळे नातेसंबंधात तणाव निर्माण होत कौटुंबिक हिंसाचारात वाढ झाली आहे. जिल्हा परिसरात अशा दोन घटना घडल्या आहेत. संशय घेत एकाने पत्नीचा खून केला, तर एकाने ठार मारण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

सोमनाथ गवळी (रा. पेठ) हा पत्नी विठाबाईच्या चारित्र्यावर सातत्याने संशय घेत होता. यावरून त्यांच्यात नेहमी वाद होत. रविवारी सायंकाळी दोघांमध्ये पुन्हा याच कारणावरून घरात असताना वाद सुरू झाला. संताप अनावर झाल्याने संशयित सोमनाथने  विठाबाईंच्या डोक्यावर, कानावर, कपाळावर, नाकावर फावडय़ाने वार केले. या मारहाणीत विठाबाई यांचा जागीच मृत्यू झाला. पेठ पोलीस ठाण्यात  सोमनाथविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अटक केली आहे.

दुसऱ्या घटनेत, चांदवड येथील काळू सोनवणे (३०, रा. निमोण) हे पत्नी छाया (२७) सोबत गावी राहत होते. छायाच्या चारित्र्यावर काळू सातत्याने संशय घेत असे. छाया झोपेत असतांना संशयित काळूने त्यांना फावडय़ाने मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात छाया यांचे डोळे, कपाळ आणि शरीराच्या अन्य भागावर गंभीर जखमा झाल्या. छाया यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. संशयित काळू यास चांदवड पोलिसांनी अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे.