येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) स्वयंचलित वाहन केंद्राची शनिवारी दुपारी संतप्त वाहनधारकांनी तोडफोड केली. उद्घाटनापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या केंद्रात व्यवस्थापनाशी आरटीओ दलालांसह वाहनधारकांचे सातत्याने वाद सुरू होते. स्वयंचलित वाहन तपासणीत वारंवार त्रुटी काढून कालापव्यय केला जात असल्याची संबंधितांची तक्रार आहे. त्याचे पर्यवसान तोडफोडीत झाले. त्यात केंद्रातील यंत्रसामग्रीचे मोठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वाहन चालविण्यास योग्य आहे की अयोग्य याची तपासणी या केंद्रामार्फत स्वयंचलित पद्धतीने केली जाते. आधी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या या प्रक्रियेत भ्रष्टाचाराला वाव मिळतो, तसेच धोकादायक वाहने रस्त्यावर आल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढते, यावर केंद्रीय यंत्रणांनी बोट ठेवत स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राची मुहूर्तमेढ रोवली. साधारणत: वर्षभरापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले. तेव्हापासून आरटीओ दलाल, वाहनधारक यांना हे केंद्र नकोसे झाल्याचे दिसत आहे. स्वयंचलित यंत्रणा वाहनातील किरकोळ स्वरूपाच्या दोषामुळे तपासणी रद्द करते वा प्रमाणपत्र नाकारते. यामुळे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केंद्रात वारंवार हेलपाटे मारावे लागतात, असा संबंधितांचा आक्षेप आहे. यावरून मध्यंतरी बराच गदारोळ झाला होता. त्या वेळी आरटीओलगत वाहनातील दोष दूर करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. केंद्राकडून सांगण्यात आलेले दोष संबंधित व्यवस्थेतून दूर करावे, असे वाहनधारकांना सूचित केले जाते. याच ठिकाणी दुपारी काही कारणांवरून वाहनधारकांचे वाद झाले. त्यांनी एकत्रित येऊन थेट स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रात धडक मारली. केंद्रातील यंत्रसामग्रीची तोडफोड करत धुडगूस घातला. अचानक झालेल्या या प्रकाराने आरटीओ कार्यालय परिसरात गोंधळ उडाला. केंद्रातील कर्मचाऱ्यांनी भयभीत होऊन बाहेर धाव घेतली.