महिलांचे स्वतंत्र ढोल-ताशा पथक; मानधनाचा सामाजिक कार्यासाठी वापर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेशोत्सवाची धामधूम अंतिम टप्प्यात असतांना शहर परिसरात  श्री गणरायाला निरोप देण्याची जय्यत तयारी सुरू आहे. ढोल ताशा पथकांच्या दणदणाटात मिरवणुकीत पावित्र कसे जपता येईल यासाठी  मंडळांचा प्रयत्न आहे. शहर परिसरातील प्रत्येक पथकाने मानाच्या मिरवणुकीत नाशिककरांचे लक्ष वेधण्यासाठी तसेच वेगळेपण जपण्याकरीता विविध कल्पना लढविल्या आहेत. महिला ढोल ताशा पथक स्वतंत्रपणे मिरवणुकीत उतरत आहे.

पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, पुण्यासह अलीकडे नाशिकमध्ये विसर्जन मिरवणुकींमध्ये ढोलचा आवाज निनादू लागला आहे. शहरात ३० पेक्षा अधिक ढोल पथकांनी गणेशोत्सवात विविध मंडळांसमोर आपली कला सादर केली आहे. ढोल पथकांमध्ये महिला वर्गाचा टक्का वाढत असतांना स्वतंत्रपणे महिला ढोल पथक पहिल्यांदाच विसर्जन मिरवणुकीत उतरणार आहे. पैसा कमविण्याचा उद्देश न बाळगता वादनातून  मिळणारे मानधन विविध सामाजिक कार्यासाठी वापरण्याकरिता पथक आता प्रयत्न करू लागले आहेत. पारंपरिक तालवाद्यांचा वापर करत वेगवेगळ्या चालींवर मिरवणुकीत ताल धरला जाणार आहेत. शहर परिसरातील सर्व ढोल पथक पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येत विसर्जन मिरवणुकीचे पावित्र्य कसे जपता येईल, यासाठी प्रयत्न करत आहेत. महिला ढोल पथकाच्या रुचिका देशपांडे यांनी यंदा डीजेवर बंदी असल्याने पथकांना विशेष मागणी असल्याचे सांगितले.

पथकाचे पहिले वर्ष असले तरी नागरिकांचा प्रतिसाद लाभल्याचे त्यांनी नमूद केले. रामनगरीचे आशिष सोनवणे यांनी पथकातील महिला सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येत असून ढोल पथक अर्थाजनाचे साधन नसून केवळ परंपरा जपण्याचे माध्यम असल्याचे नमूद केले. यंदा मिरवणुकीत रामनगरीचे न्युझीलंडमधील ऑकलंड येथील सात सभासद हिंदू ध्वज, ढोल ताशा वाजविणार आहेत. तसेच पथकातील ध्वजाला सोन्याचा कलश असेल, अशी माहितीही सोनवणे यांनी दिली. शिवाज्ञा पथकाचे रोहित गायधनी यांनी मिरवणुकीत सर्वच ढोल पथकांना वाजविण्याची समान संधी मिळेल, या नुसार वेळेला महत्व देण्यात येणार असल्याचे सांगितले. यंदा मिरवणुकीसाठी पाच नवीन ताल बसविले असून मुख्य चौकात त्यांचे वादन होईल. तसेच मिरवणुकीत पहिल्यांदाच अंध वादक सहभागी होणार असल्याचे सांगितले.

मर्दानी खेळाचे सादरीकरण

मिरवणुकीतील डीजे किंवा अन्य वाद्यांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदुषणामुळे ढोल पथकांना मागणी वाढत असून यंदा मिरवणुकीत मर्दानी खेळाचे सादरीकरण करण्यात येणार असल्याचे तालरुद्रचे अनिरूध्द भूधर यांनी सांगितले. यात १११ ध्वजपथकांसह झांज पथक सहभागी होईल. तसेच ध्वनी प्रदुषण होऊ नये यासाठी केवळ ६० ढोल रस्त्यावर उतरविण्यात येणार आहेत. पथक सामाजिक बांधिलकी जपत मिळालेल्या मानधनातून गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह अन्य मदत करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attempt to seize the sanctity of immersion procession
First published on: 22-09-2018 at 03:29 IST