स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणअंतर्गत गाव तपासणी

देशभरात स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या मूल्यांकनासाठी केंद्र सरकारकडून स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत गावाची तपासणी १ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत केली जाणार आहे. यासाठी भ्रमणध्वनी अ‍ॅपची मदत घेतली जाणार असून अ‍ॅपवर अधिकाधिक प्रतिक्रिया नोंदवून नाशिकचे गुणांकन वाढावे, याकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.

जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी स्वच्छता सर्वेक्षणाबाबत माहिती देत सर्वानी यामध्ये सहभागी होण्याचे तसेच केंद्र सरकारने विकसित केलेल्या भ्रमणध्वनी अ‍ॅपद्वारे नाशिक जिल्ह्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांनी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ साठी जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. स्वच्छ भारत मिशनद्वारे ग्रामस्तरावर स्वच्छतेविषयी बहुअंगाने तपासणी केली जाणार आहे. जिल्ह्य़ातील एकूण ग्रामपंचायतींच्या कोणत्याही १० ते १६ ग्रामपंचायतीची पूर्णत: तपासणी केंद्रीय पथकाद्वारे होईल. केंद्र सरकारकडून निवडलेल्या सर्वेक्षण संस्थेकडून पहिल्या टप्प्यात सार्वजनिक ठिकाणांचे थेट निरीक्षण करण्यात येईल. यामध्ये शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, सर्व प्रार्थनास्थळे, बाजाराची ठिकाणे आणि इतर महत्त्वाची ठिकाणे यांचा समावेश असणार आहे. त्यात गावस्तरावर सरपंच, ग्रामसेवक, स्वच्छताग्रही, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी कार्यकर्ता, आशा कार्यकर्ती आणि शिक्षक यांच्या प्रतिक्रिया घेतल्या जाणार आहेत. ग्रामपंचायतीमधील कोणत्याही १० सामान्य ग्रामस्थांकडून प्रतिक्रिया घेण्यात येतील. यासाठी गावस्तरावर वेगवेगळ्या ठिकाणी सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात येतील.

वैयक्तिक शौचालय, सुविधांची उपलब्धता, वापर याबाबतची माहिती घेण्यात येईल. भ्रमणध्वनी अ‍ॅपवर नोंदविलेल्या प्रतिक्रिया, सुधारणा विचारात घेतल्या जातील. यामुळे जिल्ह्य़ातील कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी अ‍ॅपचा वापर करून प्रतिक्रिया नोंदवावी आणि स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ मध्ये गावातील सर्व घटकांनी मनापासून सहभागी होऊन नाशिक जिल्ह्य़ाचे चांगले गुणांकन होण्यासाठी मोलाची भूमिका पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले. बैठकीस कृषी अधीक्षक संजीव पडवळ, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर आदी उपस्थित होते.