५० हजार क्विंटल कांद्याचे लिलाव थांबले

नाशिक : याआधी खरेदी केलेल्या कांद्याची विल्हेवाट लागेपर्यंत नवीन खरेदी करणार नसल्याची व्यापारी संघटनांनी भूमिका घेतल्याने सोमवारी अनेक बाजार समित्यांचे कामकाज सुरू असूनही तब्बल ५० हजार क्विंटल कांद्याचे लिलाव थांबले. हे लिलाव पुन्हा पूर्ववत करावेत, अशी मागणी काही संघटनांनी केली. जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समित्यांना कांदा लिलाव सुरू करण्याचे निर्देश दिले. लिलाव सुरू होणे आता सर्वस्वी व्यापाऱ्यांच्या भूमिकेवर अवलंबून आहे.

जिल्ह्यात लासलगाव, पिंपळगाव, सटाणा, येवला, मनमाड, नांदगाव, उमराणे, कळवण, दिंडोरी, सिन्नर या बाजार समित्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात कांदा येतो. सध्या आवक कमी होऊनही दैनंदिन ५० ते ७० हजार क्विंटल मालाची आवक होत आहे. व्यापारी लिलावापासून दूर झाल्यामुळे किमान ५० हजार क्विंटल कांद्याचे लिलाव होऊ शकले नसल्याचा अंदाज आहे. लासलगावसह अन्य बाजार समित्यांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू होते. परंतु कांदा लिलावासाठी व्यापारी फिरकले नाहीत. काही बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांनी अधिकृत पत्रही दिलेले नाही. जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव झाले नसल्याचे सांगितले. साठवणुकीच्या निकषांमुळे व्यापाऱ्यांनी आधी खरेदी केलेला माल विक्री केल्यानंतर लिलावात सहभागी होण्याची भूमिका घेतली आहे. जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांना मंगळवारपासून कांदा लिलाव सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक बाजार समितीत किती कांदा व्यापारी आहेत, याची माहिती मागविण्यात आल्याचे खरे यांनी सांगितले.

साठवणुकीवरील निर्बंधांच्या विरोधात जिल्ह्यातील व्यापारी लिलावापासून दूर झाल्याचा फटका अखेर उत्पादकांना बसला. व्यापाऱ्यांच्या भूमिकेला आधी काही शेतकरी संघटनांनी पाठिंबा दर्शविला. परंतु बाजार बंद राहिल्यास साठविलेल्या कांदा खराब होण्याबरोबर सणोत्सवात आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागणार असल्याचे काहींचे म्हणणे आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने जिल्हा उपनिबंधकांना निवेदन देऊन कांदा लिलाव तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. राष्ट्रवादीत गेलेल्या हंसराज वडघुले यांनी व्यापाऱ्यांनी बेकायदेशीर संप पुकारल्याचा

आरोप केला. कांदा धोरणाने केंद्र सरकारचा बेगडी चेहरा समोर येत आहे. कांदा जीवनावश्यक वस्तूतून वगळला. परंतु तथाकथित कायदेशीर मार्गाने कायदा मोडण्यासाठी केंद्र सरकार रोज नवी खेळी करत आहे. व्यापाऱ्यांच्या बंदमुळे ऐन दिवाळीच्या सणात शेतकरी भरडला जात आहे. लिलाव तातडीने सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा वडघुले यांनी दिला. लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी साठवणुकीची मर्यादा वाढविण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्राने निश्चित केलेल्या मर्यादेत दैनंदिन खरेदी, साठवणूक वा माल बंदिस्त करून पाठविण्याची प्रक्रिया पार पडू शकणार नाही. बाजार समितीत आलेल्या सर्व कांद्याचे व्यवहार होऊ शकणार नाहीत. विक्री न झालेला माल शेतकऱ्यांना पुन्हा न्यावा लागेल, भाव आणखी कमी होतील, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.