देवळा तालुक्यातील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याची २००७-२०१५ या कालावधीतील आर्थिक वर्षांचे स्वतंत्र लेखापरीक्षण सहकार विभाग तसेच साखर आयुक्तांकडून करण्यासंदर्भातच्या मागणीवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य सहनिबंधकांनी (लेखा परीक्षण) अहमदनगर विभागाचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांना दिले आहेत.
कारखान्याचे २००७-२०१५ या कालावधीतील अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक यांच्या कार्यकाळातील स्थिती, कर्ज रक्कम, कर्ज विनियोग, विविध परवानगी या सर्वच बाबतीत झालेली अनियमितता लक्षात घेऊन कारखान्याचे २००७-२०१५ या आर्थिक वर्षांचे स्वतंत्र लेखापरीक्षण साखर आयुक्तांकडून करण्याची मागणी वसाका बचाव परिषदेचे निमंत्रक सुनील देवरे यांनी सहनिबंधकांकडे केली होती. प्रादेशिक सहसंचालक (साखर) अहमदनगर व द्वितीय विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ सहकारी संस्था नाशिक यांच्याकडील अहवालानुसार विद्यमान संचालक मंडळाच्या कार्यकाळातील निर्णयावर गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले होते. तसेच साखर आयुक्तांची पूर्वपरवानगी आवश्यक असताना अथवा र्निबध असताना मोठे आर्थिक निर्णय कारखान्याने घेतले होते. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व कार्यवाही होणे आवश्यक आहे. तसेच २०१३ ते १५ या वर्षांतील संचालक मंडळावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी देवरे यांनी केली होती. कर्ज रक्कम, कर्जाच्या रकमेचा वापर, परवानगी, अनियमितता, र्निबधप्रश्नी चौकशी करण्यात यावी, कारखान्यास महाराष्ट्र सहकार अधिनियम १९६०चे कलम ७८(अ) अन्वये १४ ऑक्टोबर २०१३ रोजी दिलेल्या नोटीसमधील सर्व आक्षेपांबाबत जबाबदारी निश्चित करावी, सहवीज प्रकल्प, वीज उत्पादन बुडितांची जबाबदारी निश्चित करावी, प्रकल्प अहवालात समाविष्ट नसलेली कामांची खरेदी, कारखाना २५०० मेट्रिक टन क्षमतेवरून ४५०० मेट्रिक टन करणे, या सर्व प्रकारांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी देवरे यांनी केली होती. त्यावर योग्य ती कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश सहनिबंधकांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांना दिले आहेत.