News Flash

वाढत्या थंडी बरोबरच स्ट्रॉबेरीच्या हंगामाला बहर!

स्ट्रॉबेरी विक्रीतून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

 

सप्तशृंगी गड, वणी-सापुतारा येथे विक्रीसाठी उपलब्ध

लाल, गुलाबी रंगाची, गोड, आंबट चवीची स्ट्रॉबेरी म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटते. अशा स्ट्रॉबेरीचा हंगाम वाढत्या थंडी बरोबरच बहरला असून लालचुटूक आरोग्यदायी स्ट्रॉबेरी जिल्ह्य़ातील सप्तशृंगी गड, वणी-सापुतारा रस्त्यावर ठिकठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे.

जगभरातील स्ट्रॉबेरी उत्पादनात अग्रेसर असलेल्या महाबळेश्वरबरोबरच नाशिक जिल्ह्य़ातील सुरगाणा, कळवण तालुक्यातील घाटमाथ्यावर लाल मातीत पिकणारी लालभडक, आंबटगोड अशी स्ट्रॉबेरीची फळे वणी, सप्तशृंगी गड आणि सापुतारा रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाली असून रस्त्याने ये-जा करणारे भाविक आणि पर्यटकांना ती आकर्षित करीत आहेत. सुरगाणा तालुक्यातील प्रामुख्याने घाटमाथ्यावरील नागशेवडी, घोडांबे, पोहाळी, सराड, चिखली, शिंदे, हतगड, बोरगांव, घागबारी, लिंगामा आदी भागात, तर कळवणच्या पश्चिम भागातील पळसदरचे खोरे, सुकापूर, देवळी कराड, खेकुडे, बोरदैवत, वडापाडा आदी गावांतील आदिवासी शेतकरी भात, नागली, मका, भुईमूग, कुळीद, उडीद, दादर, गहू या पारंपरिक पिकांसह आता शास्त्रशुद्ध पद्धतीने स्ट्रॉबेरीचे पीक घेत आहेत.

या भागात स्ट्रॉबेरीच्या पिकासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण, जमिनीचा पोत यामुळे या भागात सात-आठ वर्षांपासून स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी होऊ  लागल्याने दिवसेंदिवस स्ट्रॉबेरीच्या लागवडीचे क्षेत्र वाढतच आहे. विंटर, एसए कॅमेर ओझा, नादिला, आर दोन, आर एक, तसेच स्वीट चार्ली आदी प्रकारच्या स्ट्रॉबेरीचे वाण असले तरी या भागात सेल्वा, राणी, इंटर, नाभिया यांसह कमी दिवसात लालभडक मोठे फळ देणाऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड मोठय़ा प्रमाणात आहे.   या वाणांची रोपे येथील आदिवासी शेतकरी प्रामुख्याने महाबळेश्वर येथून १५ ते २५ रुपयांस एक रोप या दराने आणतात. नगदी पीक असलेल्या स्ट्रॉबेरीमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या हातात आता पैसा खेळू लागला आहे. मोठे शेतकरी हे एक किलो, दोन किलोचे खोके भरून मुंबई, सुरत, नवसारी, बिल्लीमोरा, वघई, भरूच, वाझदा येथे माल पाठवतात. काही शेतकरी जागेवरच परिसरातील व्यवसायिकांना स्ट्रॉबेरी विकतात. बहुतांशी शेतकरी हे स्वत:च स्ट्रॉबेरी खोक्यात भरून वणी, नांदुरी, सप्तशृंगी गड, सापुतारा रस्त्यांवरही ठिकठिकाणी मिळेल त्या ठिकाणी आपली दुकाने थाटून विकतात. स्ट्रॉबेरी विक्रीतून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

थंडी उपयुक्त

स्ट्रॉबेरी हे थंडीत पिकणारे फळ असल्याने त्याचा मुख्य बहर डिसेंबर, जानेवारी महिन्यांत असतो. स्ट्रॉबेरीचे एकूण सहा बहर मिळतात. सध्या दुसरा बहर सुरू आहे. डिसेंबर, जानेवारी महिन्यांत सर्वाधिक स्ट्रॉबेरी बाजारात विक्रीसाठी येते. सध्या थंडीचे प्रमाण चांगले असल्यामुळे ते स्ट्रॉबेरी पिकास उपयुक्त ठरत आहे. स्ट्रॉबेरी आकाराने मोठी आणि चवीला उत्तम असल्याने त्यास मागणी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 1:58 am

Web Title: available for sale at saptashringi gad wani saputara akp 94
Next Stories
1 नाशिक विभागीय अंतिम फेरीत चार एकांकिका
2 काँग्रेस-शिवसेना आघाडीला भाजपचेही समर्थन
3 ‘इडियट बॉक्स’ मोठा गुरू !
Just Now!
X