येथील कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय, प्रगतिशील लेखक संघ, आशिर्वाद फाऊंडेशन, केटीएचएम महाविद्यालय यांच्यावतीने ४ सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत.

या बाबतची माहिती पत्रकार परिषदेत स्वागताध्यक्ष डॉ. मनीषा जगताप यांनी दिली. गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात सभागृहात सकाळी साडे आठ वाजता अशोक स्तंभ येथून प्रबोधन फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. जयंत जायभावे आणि स्थायी समिती सभापती सलीम शेख उपस्थित राहणार आहेत. ही फेरी अशोक स्तंभ परिसरातून केटीएचएम महाविद्यालय मार्गे रावसाहेब थोरात सभागृह येथे येईल.

उद्घाटन सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार उपस्थित राहतील. उद्घाटन सत्रानंतर दुपारी बारा वाजता ‘डॉ. बाबासाहेब यांचे परराष्ट्र धोरणविषयक विचार आणि सध्यस्थिती’ या विषयावर प्रा. डॉ. विजय खरे यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच ‘डॉ. बाबासाहेबांचे विचार आणि विद्यमान स्थिती’ या विषयावर परिसंवाद होईल. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ अध्यक्षस्थानी राहणार असून डॉ. सुरेंद्र जोंधळे, डॉ. चैत्रा रेडकर सहभागी होतील. सायंकाळच्या सत्रात प्रा. डॉ. गोपाळ गुरू यांचे ‘डॉ. बाबासाहेब यांचे राष्ट्रीय एकात्मतेविषयीचे विचार आणि सध्यस्थिती’ या विषयावर व्याख्यान होईल.

संमेलनाचा समारोप ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, भाकपचे सरचिटणीस डॉ. भालचंद्र कानगो, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे उपस्थित राहतील. संमेलनास साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.