पोलिसांना मारहाणीचे प्रकार वाढले

शहरातील वाढत्या गुन्हेगारीविरुद्ध कठोर उपायांची गरज निर्माण झाली असतांना पोलिसांचा धाक नसल्याने पोलिसांनाच सध्या नाशिक शहरात मार खावा लागत असल्याचे प्रकार घडत आहेत. ‘लोहपुरुष’ म्हणून ठिकठिकाणी सत्कार स्वीकारणारे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी खरोखरच लोहपुरुषाचा अवतार करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

उपनगर भागातील बोधलेनगर परिसरात आठ संशयितांसह पाच महिलांनी तरुणाला भांडण सोडविण्याच्या कारणातून जबर मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार थांबविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करत मारहाण करण्यापर्यंत संशयितांची मजल गेली. पोलीस यंत्रणेला हे एकप्रकारे आव्हान असून पोलिसांची जरब नसल्यानेच असे प्रकार घडू लागले आहेत. दोनच दिवसापूर्वी बेशिस्त रिक्षाचालकाने वाहतूक पोलिसाला शर्ट फाटेस्तोवर मारहाण केली होती. खून-खुनाचा प्रयत्न, धक्काबुक्की वेगवेगळ्या माध्यमातून गुन्हेगारी टोळ्या सक्रिय होऊ लागल्या आहेत.

आकाश गांगुर्डे (रा. पंचक) आणि गणेश शेवरे यांच्यात काही दिवसांपासून वैमनस्य आहे. यातून रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास गणेश शेवरे आणि त्याच्या साथीदारांनी आकाशला उपनगर येथील उत्तरानगर परिसरात अडविले. शेवरे आणि त्यांच्या साथीदारांनी हातातील लाकडी दंडुक्यांनी आकाशला बेदम मारहाण करत रक्तबंबाळ केले. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी संशयित शेवरे, अजय गाढवे, तुकाराम शेवरे, भावेश पवार, ऋषभ साळवे, तुषार पोवार, अजय साळवे, भीमा पोटिदे हे आकाशला मारहाण करतांना आढळले. पोलिसांनी जमावाला शांत करत आकाशला तातडीने आपल्या वाहनात बसवून उपचारासाठी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने संतप्त झालेल्या संशयितांनी पाच महिलांना पुढे करत पोलिसांच्या अंगावर मिरचीची पूड फेकत त्यांचे वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी जादा कुमक बोलावली, परंतु संशयितांनी पोलिसांना धक्काबुक्की, मारहाण करत त्यांच्या वाहनावर दगडफेक केली. पोलीस व्हॅनचे यामध्ये नुकसान झाले. पोलीस अधिकारी संदीप कांबळे यांच्या डोळ्यात मिरचीची पूड गेल्याने ते किरकोळ जखमी झाले. या गदारोळात पोलिसांनी जखमी आकाशसह अन्य जखमींना तातडीने बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू करत संशयितांविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हेगारांची पोलिसांना मारण्यापर्यंत गेलेली मजल कायदा सुव्यस्थेविषयी चिंता निर्माण करणारी आहे.

दोनच दिवसापूर्वी वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या पोलिसाला बेशिस्त रिक्षाचालकाने मारहाण केली होती. त्यामुळेच पोलीसच सुरक्षित नाहीत, तर सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.