परिचारिका संघटनेचा आंदोलनाचा इशारा

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासन करोनाविरूध्दच्या लढाईत महत्वपूर्ण भूमिका बजावत असतांना कर्मचाऱ्यांकडे मात्र सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत आहे. करोना कक्षात काम करणाऱ्या परिचारिका तसेच सफाई कर्मचाऱ्यांना निकृष्ठ दर्जाचे जेवण दिले जात आहे. याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास नाशिक जिल्हा परिचारिका संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतंत्र करोना कक्ष सुरू करण्यात आला आहे. कक्षात आवश्यक सोयी सुविधा असल्याने रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचा दावा रुग्णालय व्यवस्थापनाकडून होतो. रुग्ण बरे होत असल्याची टिमकी वाजवितांना रुग्णालय व्यवस्थापन परिचारिका, सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत आहे. सध्या करोना कक्षात ७० परिचारिका वेगवेगवेळ्या सत्रात काम करीत आहेत. यामध्ये सात दिवस काम केल्यानंतर सात दिवस अलगीकरण करून घरी पाठविले जाते. घरी पाठवितांना परिचारिका, सफाई कर्मचाऱ्यांचे घशातील द्रव्यांचे नमुने तपासणे गरजेचे असतांना त्यांना तपासणीशिवाय घरी पाठविण्यात येत असल्याचा प्रकार जिल्हा रूग्णालयात  घडत आहे.

करोना कक्षात काम करणाऱ्या परिचारिकांना चहा, नाश्ता वेळेत मिळत नाही. चहा, नाश्ता, पिण्याचे पाणी घेऊन संरक्षण साहित्य परिधान केल्यानंतर परिचारिका रुग्ण सेवेत हजर होतात. त्यानंतर आठ ते १२ तासाच्या वेळेत त्यांना पाणी पिता येत नाही. नैसर्गिक विधीसाठीही जाता येत नाही. त्यामुळे त्यांना वेळेत जेवण आणि अल्पोहार, चहा, आरोग्यदायी पेय मिळणे गरजेचे आहे. टाळेबंदी असल्याने अन्य बाहेरील खाद्य सेवा बंद असतांना सर्व पर्याय खुंटले आहेत. या पाश्र्वभूमिवर परिचारिकांना वेळेत चांगल्या दर्जाचे जेवण देण्याची मागणी नाशिक जिल्हा परिचारिका संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

कधी चहाही नाही, नाश्ताही नाही..

करोना कक्षात हॉटेलमधून जेवण विनामूल्य येत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी ही सेवा बंद करत असल्याचे सांगितले. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक आणि अन्य अधिकाऱ्यांना माहिती दिली. आठ दिवसांपासून जेवण अतिशय निकृष्ठ दिले जात आहे. सकाळचा चहा १० वाजता दिला जातो, तर कधी दिला जात नाही. नाश्ताही नाही. अशा स्थितीत काम कसे करायचे? प्रत्येक वेळी निधी, अनुदान नाही असे सांगितले जाते. जेवणाची मूलभूत गरज पूर्ण होत नसेल तर दुर्देव ते काय? सरकारकडे आमच्या जेवणासाठी पैसे नाही. दुसरीकडे सात दिवस काम केल्यानंतर घरी सोडतांना किमान तपासणी करण्याची तसदीही जिल्हा रुग्णालय घेत नाही.

– पूजा पवार, (अध्यक्ष, नाशिक जिल्हा परिचारिका संघटना)