नवरात्रोत्सवानिमित्त नांदुरी येथील सप्तशृंग गडावर येणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने व्यवस्था करण्यात येत असतांना नाशिक दिंडोरीमार्गे नांदुरी रस्त्याच्या बिकट अवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष गेलेले नाही. त्यामुळे राज्यभरातून येणाऱ्या भाविकांच्या सहनशीलतेची हा रस्ता परीक्षाच पाहणार असून हा रस्ता दोन राज्यांना जोडणारा आंतरराज्य मार्ग असूनही खड्डय़ांमुळे त्याची स्थिती एखाद्या खेडेगावाकडे जाणाऱ्या रस्त्यासारखी झाली आहे.

नाशिक, दिंडोरी, वणीमार्गे जाणारा रस्ता पुढे गुजरातला जाऊन मिळतो. दोन राज्यांना जोडणारा हा मार्ग असल्याने तो अन्य महामार्गाप्रमाणे व्यवस्थित असणे गरजेचे आहे. परंतु, वास्तव वेगळेच आहे. कित्येक दिवसांपासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात न आल्याने खड्डय़ांमधूनच वाहनांना मार्ग काढावा लागतो. रस्त्याला खड्डेच इतके आहेत की, कोणत्याही गतिरोधकाची व्यवस्था न करताही वाहने या रस्त्याने संथपणेच चालवावी लागतात. आणीबाणीप्रसंगी अग्निशमन वाहनास कितीही तातडीने जाणे आवश्यक असले तरी हा रस्ता त्यांना तसे करू देत नाही. रस्त्यावरील खड्डे अग्नीशमन वाहनाचाही वेग कमी करतात. या रस्त्याने रुग्णांना आणि वयोवृध्दांना वाहनातून नेणे म्हणजे त्यांच्या जिवाशी खेळण्यासारखे आहे. आरामदायी वाहनातून प्रवास करणाऱ्यांनाही आपण एखाद्या खटारा वाहनातून प्रवास करीत आहोत की काय, असे वाटण्याइतपत रस्त्याची स्थिती बिकट झाली आहे.

दिंडीरीपासून रस्त्याची अवस्था बिकट होण्यास सुरुवात होते. रस्त्यावरील खड्डय़ांमुळे प्रवाशांना त्रास तर होतोच, परंतु वाहनांचेही नुकसान होत असल्याने हे गडावर जाणारे अनेक जण देवळा, कळवणमार्गे रस्त्याचा पर्याय निवडतात. नाशिककरांसाठी हा पर्याय अधिक अंतराचा असला तरी वाहन आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अनेक जण या पर्यायाचा अवलंब करू लागले आहेत. किमान नवरात्रोत्सवानिमित्ताने तरी प्रशासनाच्या वतीने या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येईल, अशी वाहनधारकांना अपेक्षा होती.

अलीकडेच रस्ता दुरुस्ती कामाला मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सुरूवात होणार होती. अवनखेड फाटा येथे त्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री येणार असल्याने नाशिक ते अवनखेड फाटय़ापर्यंत युद्धपातळीवर रस्त्याची डागडुजी करण्यात आली. अवनखेड फाटय़ापुढे रस्ता तसाच ठेवण्यात आला. मंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने दुरुस्तीचे कामही आता थांबले आहे.

मी दोन-तीन दिवसांपूर्वी कळवण येथे गेलो असता दिंडोरी ते वणी या सुमारे १४ किलोमीटरचा रस्ता अतिशय खराब झाल्याचे आढळून आले. रस्ता खराब झाल्यो वाहनांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत आहे. पुढे काही ठिकाणी नांदुरीपर्यंत रस्त्याची अवस्था खड्डेमयच आहे. नवरात्रोत्सवात नाशिकहून सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी नाशिक-सोग्रस-देवळा-कळवण-नांदुरी या मार्गाचा पर्याय निवडावा    -रमेश पवार, नाशिक