News Flash

बागलाणच्या विद्यार्थी-शिक्षकांची नावे मंगळावरील अवकाशयानात!

अवकाशयानाच्या ‘स्टेनसिल्ड चिप’वर नोंद होणार

बागलाण येथे विद्यार्थ्यांना ‘नासा’चे नोंदणी पत्र वितरित करताना प्रभारी गटशिक्षणाधिकारी टी. के. घोंगडे, केंद्रप्रमुख मधुकर भामरे, शिक्षक वामन खैरनार.

बागलाण तालुक्यातील ‘आयएसओ’ मानांकनप्राप्त जिल्हा परिषद शाळेतील १२९ विद्यार्थी-शिक्षकांची नावे जुलै २०२० मध्ये मंगळ ग्रहावर भरारी घेणाऱ्या अवकाशयानात पोहोचली आहेत. शिक्षक सोपान खैरनार यांनी काही दिवसांपूर्वी शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांची ‘नासा’च्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी केली होती.

अमेरिकेच्या ‘नासा’ संस्थेचे ‘मंगळ रोव्हर २०२०’ हे यान मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे. या अंतरिक्ष यानाबरोबर ‘स्टेनसिल्ड चिप’वर आपली नावे पाठवून मानवी इतिहासातील पाऊलखुणा दुसऱ्या ग्रहावर सोडण्याची ऐतिहासिक संधी ‘नासा’ने जगभरातील सामान्य जनतेला उपलब्ध करून दिली आहे. ही मोहीम नासा चंद्र मोहीम ते मंगळ मोहिमेच्या प्रवासापर्यंतच्या मोहिमेला उद्देशून सार्वजनिक सहभाग अंतर्गत राबविली जात आहे. ‘नासा’च्या कॅलिफोर्निया येथील प्रयोगशाळेत इलेक्ट्रॉनिक बीमचा वापर करून सिलिकॉनच्या चिपवर अतिसूक्ष्म आकारात नावे ‘स्टेन्सिल’ केली जाणार आहेत.

एक डेमी आकाराच्या चिपवर १० लाख नावे मावणार असून या चिप रोव्हरवर काचेच्या आवरणाखाली जतन करून मंगळावर पाठवल्या जाणार आहेत. ऐतिहासिक मंगळ अभियानासाठी तयारी करताना सर्व जण त्यात सहभागी व्हावेत, सर्वाना त्याची माहिती व्हावी, या उद्देशाने ‘नासा’ हा उपक्रम राबवीत आहे.

जिल्हा परिषद मोरेनगरच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांची तसेच शिक्षक, शाळेचेही नाव या उपक्रमासाठी नोंदवले होते. त्या नावांची नोंद होऊन त्यासंबंधीचे ऑनलाइन ‘बोर्डिग पास’ शाळेला प्राप्त झाले. बागलाणचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी टी. के. घोंगडे, केंद्रप्रमुख मधुकर भामरे, शिक्षक वामन खैरनार यांच्या हस्ते त्याचे वितरण करण्यात आले.

मोरेनगरसारख्या खेडेगावातील मुलांच्या मनात प्राथमिक शिक्षणापासून अवकाश संशोधनाबद्दल माहिती होऊन त्यांना शालेय शिक्षणाबरोबर नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी म्हणूनच या उपक्रमाच्या माध्यमातून आपली नावे मंगळावर पाठवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. याद्वारे विज्ञान, तंत्रज्ञानाशी विद्यार्थ्यांची नाळ घट्ट करण्याचा प्रयत्न असल्याची भावना शाळेचे मुख्याध्यापक नारायण सोनावणे यांनी व्यक्त केली.

इतर विद्यार्थ्यांनाही नोंदणी करता येणार

आमच्या शाळेतील सर्व १२२ विद्यार्थी आणि सात शिक्षक अशी १२९ जणांची नावे या माध्यमातून मंगळावर पाठवण्यासाठी नोंदवली आहेत. इतर विद्यार्थी ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत या उपक्रमांतर्गत आपले नाव मंगळावर पाठवण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करू शकतात. अधिकाधिक नावनोंदणी करून अवकाश, संशोधन याचा प्रचार-प्रसार करू, असे आवाहन सोपान खैरनार यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 12:55 am

Web Title: baglan students teacher names on mars abn 97
Next Stories
1 नाशिकच्या रोशनी मुर्तडकची भारतीय संघात निवड
2 प्रवासी विमानसेवा भरभराटीचा मार्ग मोकळा
3 ध्रुवनगर दुर्घटना : बांधकाम व्यावसायिक फरार, चार जणांना अटक
Just Now!
X