नवरात्रोत्सवासाठी महापालिकेची नियमावली

नाशिक : करोनाच्या संकटामुळे गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवदेखील शांततेत आणि गर्दी न करता साध्या पद्धतीने साजरा करणे बंधनकारक ठरणार आहे. सार्वजनिक मंडळांना देवीची मूर्ती चार फूट तर घरगुती मूर्ती दोन फूट या मर्यादेत ठेवावी लागणार आहे. गरबा-दांडिया आणि तत्सम सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यास प्रतिबंध आहे. देवीच्या दर्शनाची ऑनलाइन व्यवस्था करून गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना महापालिकेने केली आहे. दसऱ्याच्या दिवशीचा रावण दहन कार्यक्रम प्रतीकात्मक स्वरूपात असावा. आवश्यक त्या व्यक्तींशिवाय गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.

सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने महापालिकेने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. करोना काळात सर्व नवरात्रोत्सव मंडळ, भाविकांनी याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन आयुक्त कैलास जाधव यांनी केले. शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गणेशोत्सव नियम, अटींचे पालन करून साध्या पद्धतीने साजरा झाला. त्याच धर्तीवर नवरात्रोत्सव, दुर्गा पूजा, दसरा साजरा करण्याचे नियोजन आहे. सार्वजनिक ठिकाणी तात्पुरता मंडप उभारण्यास ऑनलाइन परवानगी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सार्वजनिक मंडळांना स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावे. देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरिता चार फूट आणि घरगुती देवीच्या मूर्तीची उंची दोन फूट मर्यादित राहील. यंदा शक्यतो पारंपरिक देवीच्या मूर्ती ऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जनस्थळी करण्याबाबत प्रशासनाशी समन्वय ठेवावा. नवरात्रोत्सवासाठी स्वेच्छेने दिली जाणारी वर्गणी, देणगी स्वीकारावी. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. आरोग्यविषयक, सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास प्राधान्य द्यावे. ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या मोहिमेबाबतदेखील जनजागृती करण्याची सूचना करण्यात आली आहे.

देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाइन, संकेतस्थळ वा फेसबुक आदी माध्यमातून उपलब्ध करावी. देवीच्या मंडपात र्निजतुकीकरण तसेच थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणारे भाविक करोनाचे नियम पाळतील याकडे मंडळांना लक्ष द्यावे लागणार आहे. देवीचे आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढण्यास परवानगी नाही. विसर्जनाच्या वेळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी. मंडपात एकावेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्त्यांना उपस्थित राहता येणार नाही, असे महापालिकेने म्हटले आहे.

रावण दहन कार्यक्रम ऑनलाइन प्रक्षेपित करण्याचे आवाहन

नवरात्रोत्सवाचे खास आकर्षण असणारा गरबा, दांडिया यंदा रंगणार नाही. गरबा, दांडिया आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यास प्रतिबंध आहे. त्याऐवजी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे आयोजित करण्यास महापालिकेने सुचवले आहे. त्या माध्यमातून करोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजार, त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करावी. दसऱ्याच्या दिवशी होणाऱ्या रावण दहनाच्या कार्यक्रमास अटींसह परवानगी आहे. हा कार्यक्रम सर्व नियम पाळून प्रतीकात्मक स्वरूपाचा असावा. रावण दहनासाठी आवश्यक तेवढय़ा किमान व्यक्ती हजर राहतील, प्रेक्षकांना बोलवू नये. त्यांना फेसबुक वा ऑनलाइन माध्यमातून थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करावी, असे आवाहन आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.