बंदिस्त रस्त्यांबाबत लवकरच निर्णय

नाशिक : शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत गर्दीवर नियंत्रणासाठी वाहनांचा प्रवेश बंद करण्याकरिता लोखंडी जाळ्या, बांबूंच्या सहाय्याने रस्ते बंदिस्त करण्याचे नियोजन शासन, प्रशासनाच्या नव्या अधिसूचनेमुळे औटघटकेचे ठरले आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच दुकाने, बाजारपेठा ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याने परिसरातील बंदिस्त रस्ते पुन्हा मोकळे करायचे की नाही, याबाबत वरिष्ठांशी विचारविनिमय करून निर्णय घेण्यात येणार आहे. सोमवारी मध्यवर्ती बाजारपेठेतील बंदिस्त रस्त्यांवर वाहनासह प्रवेश मिळावा म्हणून अनेकांनी आग्रह धरला. संबंधित चालक वाहने घेऊन येत असल्याने संबंधित ठिकाणी काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस, महापालिका विविध पातळीवर प्रयत्न करीत आहेत. त्या अंतर्गत मध्यवर्ती बाजारपेठेतील गर्दी नियंत्रित करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी मेनरोड, नेपाळी कॉर्नर, सराफ बाजार, दहीपूल आदी भागात जाणारे रस्ते लोखंडी जाळ्या, बांबू लावून बंदिस्त करण्यात आले. वाहने बाहेर उभी करून ग्राहकांनी प्रवेशपत्र घेऊन बाजारपेठेत पायी जावे अशा प्रकारे नियोजन करण्यात आले. दरम्यानच्या काळात म्हणजे रविवारी रात्री राज्य शासनाने र्निबध अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला. जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, खासगी कार्यालये, बाजारपेठा, नाटय़गृहे बंद ठेवण्याचे निश्चित झाले आहे. या निर्णयामुळे जीवनावश्यक वगळता सर्व बाजारपेठा, तेथील दुकाने बंद राहतील. मध्यवर्ती बाजारपेठेत रविवार कारंजा आणि आसपासच्या भागात जीवनावश्यक वस्तुंची दुकाने आहेत. या भागातील दुकाने वगळता मध्यवर्ती बाजारपेठेतील अन्य सर्वच दुकाने बंद राहतील. यामध्ये मेनरोड, दहीपूल, सराफ बाजार, भांडी बाजारासह सभोवतालच्या अन्य बाजारपेठांचाही समावेश आहे. या भागात वाहनांची गर्दी रोखण्यासाठी बंदिस्त केलेल्या रस्त्यांचे आता काय करायचे, हा प्रश्न पोलीस यंत्रणेला पडला आहे. या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून रस्त्यांबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले.

सोमवारी ही व्यवस्था कार्यान्वित होती. मध्यवर्ती बाजारपेठेतील रस्ते अरुंद आहेत. या भागात वाहनांना प्रवेश बंद केला गेला असला तरी काही चालक थेट लोखंडी जाळीपर्यत येऊन वाहनासह पुढे मार्गस्थ होऊ द्यावे, अशी विनंती करीत होते. परिणामी, लोखंडी जाळ्या, बांबूने बंदिस्त केलेल्या ठिकाणी काही काळ कोंडी झाल्याचे चित्र होते.