नाणी पसरवीत ग्राहकांकडून निषेध

बँकांच्या एटीएममधील रोकड टंचाईमुळे सर्वसामान्यांमध्ये आधीच अस्वस्थता असताना आता बँकांनी रिझव्‍‌र्ह बँकेकडून नाणी स्वीकारण्याचे निर्देश असताना ग्राहकांची नाणी स्वीकारण्यास नकार दिल्याचा प्रकार पुढे आला आहे. बँक ऑफ इंडियाच्या देवळाली कॅम्प शाखेत ग्राहक असलेल्या शेतकऱ्यांकडे असलेली दहा रुपयांची ७०० नाणी अर्थात सात हजार रुपये स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी बँकेच्या प्रवेशद्वारासमोर ही नाणी पसरवत आंदोलन केले.

बँक ऑफ इंडियाच्या देवळाली कॅम्प शाखेत मंगळवारी हा प्रकार घडला. शिवाजी वाघ व नामदेव वाघ हे शेतकरी ग्राहक दहा रुपयांच्या नाण्याच्या स्वरूपात असणारी रक्कम घेऊन या शाखेत पोहोचले. संबंधितांकडे ७०० नाणी होती. इतक्या मोठय़ा संख्येने नाणी पाहून बँक कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. ही बाब बँकेच्या शाखा व्यवस्थापकाकडे गेली. ग्राहक नाणी स्वरूपात पैसे बँकेतून घेत नसल्याने दहा रुपयांची नाणी घेणे टाळले जाते, असे सांगण्यात आले. वास्तविक, वैध चलन स्वीकारणे प्रत्येक बँकेला बंधनकारक आहे. नाणी स्वीकारण्यास नकार देणाऱ्या बँकांवर कारवाईचा इशारा दिला गेला आहे. या स्थितीत हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वाघ यांनी नाणी स्वीकारण्याचा आग्रह लावून धरला. अखेरीस बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दररोज १०० रुपयांची नाणी घेतली जातील असे सांगितले. म्हणजे सात हजार रुपये भरण्यासाठी ७० वेळा ग्राहकाने बँकेत खेटा माराव्या असे कर्मचाऱ्यांना अपेक्षित होते. बँकेच्या असहकार्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी बँकेसमोर ही नाणी पसरवत आंदोलन सुरू केले.

पाच व दहा रुपयांसह इतरही नाणी आज चलनात आहे. बँका ग्राहकांकडून नाणी स्वीकारत नसल्याने किरकोळ व्यवहारांमध्ये नाण्यांचा वापर रोडावला आहे. मध्यंतरी असे काही प्रकार घडल्यानंतर नाणी न स्वीकारणाऱ्या बँकांवर कारवाईचे संकेत दिले गेले. या स्थितीत सरकारच्या अखत्यारीतील राष्ट्रीयीकृत बँका नाणी न स्वीकारून वैध चलनावर प्रश्नचिन्ह उभे करीत असल्याचा मुद्दा ग्राहक मांडत आहेत.

ग्राहकांनी बँकांकडून नाणी स्वीकारली तर बँकाही नाणी स्वीकारतील, असा अजब पवित्रा बँकेने घेतला. नाण्यांचा तिढा सोडविण्यासाठी ग्राहकांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. महिला रोखपालांनी नाणी मोजण्यात किती वेळ जाईल हे कारण पुढे करत ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली नाही. राष्ट्रीयीकृत बँका वैध चलनाबाबत अशी कार्यपद्धती अवलंबू लागल्यास आम्ही कुठे दाद मागायची, असा प्रश्न ग्राहकवर्गाकडून उपस्थित होत आहे.