News Flash

चलन संघर्षांत ग्राहकांसोबत बँक अधिकारी-कर्मचारी भरडले

नियंत्रणाबाहेर चाललेल्या स्थितीला बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.

   नाशिक शहर व ग्रामीण भागातील बँकांमध्ये ग्राहकांच्या अशा गर्दीला कर्मचाऱ्यांना हाताळावे लागत आहे. 
  • गर्दी हाताळताना ज्येष्ठांना आरोग्य समस्या
  • शाईविना चलन वितरण

नोटाबंदीनंतरचा गोंधळ आठवडाभरानंतरही कायम असून शहरातील सर्वच बँकांमध्ये व्यवहारातून रद्दबातल ठरलेल्या जुन्या नोटा बदलण्यासाठी सर्वसामान्यांची दमछाक होत आहे. लांबलचक रांगांमध्ये उभे राहण्याचा नागरिकांना जसा त्रास होत आहे, तसाच त्रास प्रचंड गर्दीमुळे बँकेतील कर्मचाऱ्यांनाही होत आहे. ही स्थिती हाताळताना बँकेतील ज्येष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या तक्रारीही भेडसावत असल्याचे समोर आले आहे. बहुतांश शाखांमध्ये गर्दी पाहून काही जण आपले वजन वापरत रांगेचा नियम मोडण्याचा प्रयत्न करत असल्याने कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. या गोंधळात सरकारने नोटा बदलण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांच्या बोटावर शाई लावण्याचा निर्णय घेतला. तथापि, ही शाई बुधवारी सायंकाळपर्यंत शहर व ग्रामीण भागातील बँकांपर्यंत पोहोचलीच नव्हती. यामुळे शाई विना चलन वितरणाचे काम सुरू होते.

५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्दबातल ठरल्यानंतर उडालेला चलनकल्लोळ कमी होण्याऐवजी दिवसागणिक चिघळत असल्याचे चित्र आहे. शहर व ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत आणि नागरी सहकारी बँकांच्या शेकडो शाखा आहेत. जुन्या नोटा बँकेतून बदलवून दिल्या जात असल्याने सध्या सर्व शाखांमध्ये ग्राहकांची गर्दी ओसंडून वाहत आहे. तांत्रिक कारणास्तव बहुतांश एटीएम कार्यान्वित होऊ शकली नाहीत. परिणामी, आपल्या खात्यातून पैसे काढणे वा भरण्यासाठी बँकेत रांगेत उभे राहण्याशिवाय गत्यंतर नसल्याची सामान्य ग्राहकांची भावना आहे. कित्येक तास रांगेत उभे राहिल्यावरही पैसे मिळतील, याची शाश्वती नाही. बहुतांश बँकांना चलन तुटवडय़ाला तोंड द्यावे लागत आहे. मागणीच्या तुलनेत चलन पुरवठय़ाचे प्रमाण कमी असल्याने अनागोंदी निर्माण झाल्याची स्थिती आहे.

नियंत्रणाबाहेर चाललेल्या स्थितीला बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. चलनकल्लोळात ग्राहकांसोबत बँकेतील अधिकारी व कर्मचारी भरडले जात आहेत. हे कमी म्हणून की काय, सरकारने नोटा बदलण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांच्या बोटावर शाई लावण्याचा निर्णय घेतला. ही शाई शहर व परिसरातील बँकांना अद्याप उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे बुधवारी नोटा शाईविना बदलवून देणे क्रमप्राप्त ठरले.

नोटा बंदीचा निर्णय झाल्यानंतर मागील आठवडय़ात बँकांना एक दिवसाची सुटी देण्यात आली. या सुटीचा उपयोग बहुतांश बँकांनी पुढील कामकाजाच्या नियोजनासाठी केला. ऐनवेळी गर्दी वाढली तर काऊंटर कसे वाढवायचे, कोणावर काय जबाबदारी द्यायची, ग्राहकांना कमीत कमी वेळात पैसे कसे देता येईल, धास्तावलेल्या मनस्थितीतील ग्राहकांना सौजन्यपूर्वक वागणूक अशा अनेक मुद्यांवर अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. प्राथमिक स्वरूपात झालेल्या नियोजनावर जुन्या नोटा बदलून देणे, दैनंदिन ग्राहकांचे व्यवहार सांभाळणे आदी कामे अधिकारी व कर्मचाऱ्यांना करावी लागत आहे.

नागरी सहकारी बँकांच्या तुलनेत राष्ट्रीयकृत बँकेतील खातेदारांची संख्या अधिक आहे. त्यातच, सहकारी बँकांना चलन तुटवडय़ाचा फटका सहन करावा लागत असल्याने नोटा बदलण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांमध्ये झुंबड उडाली आहे. सात दिवसानंतरही त्यात फारसा बदल झाला नाही. एटीएम केंद्र कार्यान्वित झाले नसल्याने पैसे काढण्याचे काम प्रत्यक्ष बँकेत जाऊन करावे लागते. या सर्व ग्राहकांना हाताळणे बँक कर्मचाऱ्यांसाठी आव्हान ठरले आहे.

पैसे काढण्यासाठी तसेच चलन बदलण्यासाठीच्या लांबलचक रांगेत महाविद्यालयीन युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वाचा समावेश आहे. त्यातील काहींना प्रकृतीचा त्रास झाल्यास जनक्षोभ वाढू शकतो. यामुळे ग्राहकांची विशेष काळजी घ्यायची जबाबदारी बँकांवर आहे. या प्रक्रियेत अतिरिक्त कामामुळे कर्मचाऱ्यांवरील ताणाचा विचार काही ग्राहकांकडून होत नसल्याची संबंधितांची खंत आहे. रांगेत उभे असणारे ग्राहक हे जाब विचारण्याच्या आविर्भावात असतात.

कर्मचारी म्हणजे यंत्र मानव असून त्यांनी वायुवेगाने काम करावे, ग्राहकांना तत्पर सेवा द्यावी, ग्राहकांना अपेक्षितच नोटा द्याव्यात, जेवणाच्या सुट्टीचा कालावधी बंद किंवा कमी करावा अशा अवास्तव अपेक्षा बाळगल्या जातात. ग्राहकांच्या अशा आडमुठे वागण्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होत आहे.

गर्दीत काही विशिष्ट व्यवसायात काम करणारी मंडळी आपली ओळख देऊन थेट काऊंटपर्यंत धडकतात. त्यावर रांगेतील इतर ग्राहक आक्षेप घेतात. यावेळी रोषाला बँक कर्मचाऱ्यांना तोंड द्यावे लागते.

व्याधींनी डोके वर काढले

बँकांमधील काही ज्येष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांना या काळात रक्तदाब वाढणे वा तत्सम त्रास झाल्याचे सांगण्यात आले. जोखमीचे काम करताना अतिरिक्त ताणामुळे काहींना मूच्र्छा येणे, अचानक रक्तदाब वाढणे, रक्तातील साखर कमी-जास्त होणे असे त्रास होत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2016 1:00 am

Web Title: bank staff officer suffering problem of note banned
Next Stories
1 नोटाबंदीविरोधात भाकपची निदर्शने
2 पोलिसी कारवाईने वाहनधारक धास्तावले
3 नाशिकच्या औद्योगिक प्रश्नांबाबत ‘निमा’चे मुख्यमंत्र्यांना साकडे
Just Now!
X