जिल्ह्यतील बँकांची अवस्था; सोमवारपासून बहुतांश ‘एटीएम’ कार्यरत होणार

राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांकडे मुबलक चलन उपलब्ध असले तरी त्यात दोन हजार रुपयांच्या नोटांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे सर्वसामान्यांप्रमाणेच बँकांसमोरही १०० आणि ५० च्या नोटांची टंचाई भेडसावत असल्याची बाब समोर आली आहे. चलन बदलणे तसेच पैसे भरणे व काढण्यासाठी बँकांसमोर तासंनतास ताटकळणाऱ्या जिल्ह्यतील सर्वसामान्य नागरिकांना सोमवारपासून काहिसा दिलासा मिळणार आहे. नोटा वितरणासाठी ‘एटीएम’ यंत्रात करावयाचे बदल पुढील दोन दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांनी दिले. नोटा बंदीच्या निर्णयानंतर आजवर ग्राहकांना तब्बल ५०० कोटींचे वितरण करण्यात आले आहे.

[jwplayer eW0sv8sU]

पंतप्रधानांनी ५०० व एक हजारच्या नोटा रद्द केल्यानंतर निर्माण झालेला कल्लोळ कमी होण्याऐवजी वाढतच आहे. यापूर्वी बँकेतून एका वेळी जुन्या ४५०० रुपयांच्या नोटा बदलून घेण्याची असणारी मर्यादा दोन हजार रुपयांवर आणल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर आहे. शुक्रवारी शहर व ग्रामीण भागातील बँकांसमोर नागरिकांच्या रांगा कायम होत्या. नोटा बदलवणे, खात्यात पैसे भरणे व काढणे यासाठी सर्वच बँकांमध्ये झुंबड उडाली आहे. प्रचंड गर्दीमुळे बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण आहे. जिल्ह्यतील एकंदर स्थितीचा जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. जिल्ह्यतील नागरी सहकारी बँकांना त्यांच्या मागणीनुसार चलनाची उपलब्धता करण्यात आली आहे.

सुटय़ा पैशांसाठी बँकांकडून पाठपुरावा

जिल्ह्यत मुबलक प्रमाणात चलनाची उपलब्धता आहे. त्यात दोन हजारच्या नोटांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे बँकांनाही १०० व ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा भेडसावत आहे. या सुटय़ा पैशांची उपलब्धता करण्यासाठी बँकांकडून पाठपुरावा सुरू असल्याचे जिल्हाधिकारी बी.  राधाकृष्णन् यांनी सांगितले. मागील दहा दिवसात जिल्ह्यतील बँकांनी जवळपास ५०० कोटी रुपयांचे वितरण केले. त्यात नोटा बदल, खात्यातून पैसे काढणे आदींचा अंतर्भाव आहे. बँकासमोरील रांगा कमी करण्यासाठी बँकांची एटीएम तातडीने सुरू करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. जिल्ह्यत विविध बँकांची एकूण ९०० एटीएम आहेत. दोन हजार व ५० रुपयांच्या नोटा वितरणासाठी त्यात तांत्रिक बदल करणे अनिवार्य ठरते. तंत्रज्ञांच्या मदतीने हे काम सुरू असून आतापर्यंत २५ टक्के यंत्रात हे बदल झाले आहेत. उर्वरित एटीएम यंत्रणेत हे बदल युद्धपातळीवर करण्यास सांगण्यात आले आहे. बहुतांश काम दोन दिवसात होऊन सोमवारपासून नागरिकांना एटीएम केंद्रातून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होईल, असे राधाकृष्णन् यांनी सांगितले.

[jwplayer xpbAHLf3]