कलाकृतीची ‘वंडर’ आणि ‘जिनियस’ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद

चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणरायाला वंदन करण्यासाठी येथील रांगोळीकार नीलेश देशपांडे यांनी माघी गणेश जयंतीचे औचित्य साधत ‘बाप्पा महोत्सव’ चे आयोजन केले आहे. या अंतर्गत बुधवारी त्यांनी ३५०० स्क्वेअर फुटामध्ये विशाल गणपती रांगोळीच्या माध्यमातून साकारला. त्यांच्या या कलाकृतीची ‘वंडर बुक ऑफ वर्ल्ड  रेकॉर्ड’ आणि ‘जिनियस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे.

‘भाव तसा देव’ या उक्तीनुसार रांगोळीकार देशपांडे यांनी बाप्पांचे रूप रांगोळीच्या माध्यमातून साकारण्याचा संकल्प हाती घेतला. त्यासाठी बाप्पा महोत्सवाचे व्यासपीठ तयार केले. महोत्सवास बुधवारी लक्षिका मंगल कार्यालयात सुरुवात झाली. कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर देशपांडे यांनी आपल्या लाडक्या बाप्पाला कलाकृतीतून नमस्कार केला. सभागृहाच्या ५० बाय ७० फूट आकारात त्यांनी महागणपती रेखाटत रंग आणि रांगोळीच्या माध्यमातून पहाटे पाच वाजता कामास सुरुवात केली. महाकाय गणपती आकारास येत असतांना प्रत्येकाच्या मनातील भक्तिभाव रांगोळीत उतरावा यासाठी बाप्पाचे बोलके डोळे, त्याचा चेहरा, हातातील विविध आयुधे, गणरायाचा शेला वास्तवात आणण्यासाठी त्यांनी आपले कौशल्य पणास लावले. लंबोदर असलेला बाप्पा रांगोळीतून आकारास येत असताना पाहणाऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

महारांगोळीसाठी त्यांना १०० किलो पांढरी रांगोळी, २०० किलो रंगीत रांगोळी लागली. ही कलाकृती आकारास येण्यासाठी ५४० मिनिटांचा कालावधी लागला. कलाकृती प्रत्यक्षात आल्याचा आनंद वाटत असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. या कामासाठी त्यांना योगिता खांडेकर, अजिंक्य मोहोळकर यांच्यासह अन्य सहकाऱ्यांची साथ लाभली.

कल्पना प्रत्यक्षात

याआधी कुंभमेळ्याचे औचित्य साधत गोदाकाठ रांगोळीतून रेखाटला होता. त्याच धर्तीवर गोदाकिनारी महारांगोळी काढली होती. त्याच्या पुढचे पाऊल म्हणून साडेतीन हजार स्क्वेअर फूट परिसरात एकच कलाकृती आपण रेखाटावी ही कल्पना सुचली आणि आज ती प्रत्यक्षात आली. याचा आनंद शब्दात मांडता येण्यासारखा नाही. माझ्या मनातील बाप्पा रांगोळीतून आकारास आला तरी  हे स्वप्नवत वाटते.

नीलेश देशपांडे (रांगोळीकार)