नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट आली असून उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर जाणे टाळावे, तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत आदी विविध उपाय राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुचविले आहेत. नाशिकचा पारा ४०.४ अंशावर गेला आहे. ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक त्रस्तावले आहे.
टळटळीत उन्हाने सध्या नाशिकसह उत्तर महाराष्ट्र अक्षरश: भाजून निघाला आहे. गेल्या काही दिवसांत तापमानाचा पारा ४१ अंशावर गेल्यामुळे दिवसा घराबाहेर पडणे व भ्रमंती करणेही जिकिरीचे झाले आहे. नाशिक शहराचे सोमवारी ३९.३ अंशावर असणारे तापमान मंगळवारी ४०.४ अंशावर पोहोचले. उकाडय़ाने नागरिक हैराण झाले असताना मनमाड शहरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. रविवारपासून तीन ते चार दिवसांपासून महावितरण कोणतीही सूचना न देता वीजपुरवठा बंद करत असल्याची तक्रार आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे पंखा, कुलरसारख्या साधनांचा वापर करावा लागत असताना विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्तावले आहे. वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ रिपाइंने महावितरणच्या निषेधाचा फलक लावला आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये याची माहिती शासनाने सर्व जिल्हाधिकारी व महापालिकांना पाठवली आहे. तहान लागली नसली तरी अधिकाधिक पाणी पिणे गरजेचे आहे. हलके, पातळ सुती कपडे वापरणे, बाहेर जाताना गॉगल, छत्री अथवा टोपी, बूट व चपलांचा वापर करावा, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी असे सूचित करण्यात आले आहे. कोणी बाहेर उन्हात काम करत असल्यास ओल्या कपडय़ांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने घरी बनविलेली लस्सी, ताक, लिंबू-पाणी, आदींचा नियमित वापर करणे आवश्यक आहे. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम आदी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत.
चक्कर येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळावा. पहाटेच्या वेळी कामाचा अधिकाधिक निपटारा करावा. गरोदर वा आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यास सांगण्यात आले
आहे.
लहान मुले अथवा पाळीव प्राणी यांना बंद असलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी बारा ते तीन या काळात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत, उन्हाच्या काळात स्वयंपाक करण्याचे टाळावे. मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकगृहाची दारे व खिडक्या उघडय़ा ठेवाव्यात.
शरीरात पाण्याचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत असलेले चहा, कॉफी, मद्य व थंड पेये यांचा वापर टाळावा. शिळे अन्न खाणे टाळावे आणि उच्च प्रथिने असलेले अन्न टाळावे असे आवाहन शासनाने केले आहे.