चोरीचा संशय; युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम

निफाड तालुक्यातील खानगावथडी येथे भारत पेट्रोलियमची भूमिगत इंधनवाहिनी फुटल्याने लाखो लिटर डिझेल वाया गेले आहे. प्रथमदर्शनी हा डिझेलचोरीचा प्रकार असावा असा अंदाज व्यक्त केला जात असून एकंदरीत या प्रकारावरून प्रकल्पाच्या सुरक्षा यंत्रणेची लक्तरे पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आली आहेत. मध्यरात्री हा प्रकार वस्ती नसलेल्या निर्जन परिसरात घडला.

निफाड तालुक्यातील खानगावथडी येथील गट क्रमांक २५० मध्ये रामनाथ पंडित जगताप यांच्या शेतजमिनीत ही इंधनवाहिनी फुटली. ओएफसी संगणकीय प्रणालीमुळे घटना घडल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत त्याची माहिती कंपनीला मिळाली. मनमाड येथून भारत पेट्रोलियमचे बचाव पथक तातडीने घटनास्थळी धडकले. पथकाकडून वाहून जाणारे डिझेल खड्डय़ात साचवून ते टँकरमार्फत नेण्याचे काम हाती घेण्यात आले. प्रतिबंधात्मक उपाययोजनेस काही तासांचा अवधी लागला. या काळात वाहिनीतून मोठय़ा प्रमाणात इंधन वाहून गेले. प्रतिबंधात्मक उपाय झाल्यावर गळती थांबविण्यात यश मिळाले.

दुसरीकडे युद्धपातळीवर हाती घेण्यात आलेले वाहिनीच्या दुरुस्तीचे काम मध्यरात्रीपर्यंत पूर्णत्वास जाईल असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. रात्री उशिरापर्यंत इंधनवाहिनीची दुरुस्ती होऊन शुक्रवारी त्यातून इंधनपुरवठय़ाची चाचणी घेतल्यानंतर ती पूर्ववत केली जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

अशा संकटाच्या वेळी इंधन जमा करून आगप्रतिबंधक फोम पावडर मारली जाते. जलवाहिनी जोडण्यासाठी आवश्यक नवीन वाहिनीचा भाग पाठविला जातो. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर परिसरात कमालीची दक्षता घेण्यात आली होती. त्यानुसार उपरोक्त परिसरात नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला. ज्वलनशील इंधनाची सुरक्षितता महत्त्वाची म्हणून गळती तातडीने बंद करत रातोरात तेथील वाहिनी बदलून तेथे आणण्यात आलेली नवीन वाहिनी आणि जॉइंट जोडण्यात येतील. साचलेले इंधन जसे आहे तसे जमा करून येथून रिकाम्या टँकर-टाक्यांमधून तपासणीसाठी येथील प्रकल्पात आणण्याचे काम हाती घेण्यात आले, असे सूत्रांकडून सांगण्यात येते.

घटनेनंतर मुंबईहून पुरवठा बंद

या घटनेमुळे राज्यातील इंधन पुरवठय़ावर परिणाम होणार नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. मनमाडच्या पानेवाडी प्रकल्पात पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे दुर्घटना होऊन इंधन वाया गेले असले तरी आणि तेवढय़ा वेळेत मुंबईहून पुरवठा यंत्रणा बंद पडली असली तरी या भागातील पेट्रोल, डिझेल पुरवठय़ावर परिणाम होणार नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मनमाड साठवणूक केंद्रात नेहमीच सात दिवस पुरेल इतका पेट्रोल-डिझेलचा साठा असतो. उच्च दाबाने मुंबईहून या २५२ किलोमीटरच्या वाहिनीतून डिझेल सोडण्यात येत असल्याने काही मिनिटे जरी गळती झाली तरी त्यातून लाखो लिटर डिझेल वाया जाते. या घटनेतही लाखो लिटर डिझेल वाया गेल्याचे सांगितले जाते.

प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची तत्परता

इंधनवाहिनी गळतीसारखी दुर्घटना घडल्यानंतर नेमकी कोणती कारवाई करावी लागते, यासाठीचा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग-यंत्रणा मनमाड पानेवाडी प्रकल्पात उपलब्ध आहे. दर तीन महिन्यांनी या यंत्रणेला अद्ययावत करून रंगीत तालीम दिली जाते. अशा प्रकारची घटना घडल्यास कोणती कारवाई करावी लागते याचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. यामुळे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पथकाने परिसरातील धोका कमी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्याचे सांगितले जात आहे.

इंधनवाहिनी यंत्रणेचे कार्य

भारत पेट्रोलियमची तुर्भे (मुंबई) ते पानेवाडी (मनमाड) अशी २५२ किलोमीटर लांबीची ही भूमिगत इंधनवाहिनी १८ इंच व्यासाची आहे. सुरक्षिततेसाठी जमिनीत तीन फूट आतून ही वाहिनी टाकण्यात आली आहे. त्यातून दररोज लाखो लिटर पेट्रोल, डिझेल, घासलेट हे इंधन मुंबईहून मनमाडला येते. आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाच्या असलेल्या भारत पेट्रोलियमच्या पानेवाडी प्रकल्पात अद्ययावत ऑप्टिकल फायबर केबल, (ओएफसी) वापरण्यात आले आहे. मुंबई ते मनमाड दर दहा किलोमीटरवर व्हॉल्व्ह बसवला गेला असल्याने गळती नेमकी कोठे झाली, कोणत्या क्रमांकाच्या व्हॉल्व्हदरम्यान झाली, हे या केबलद्वारे मुख्य प्रकल्पात संगणकाद्वारे त्वरित समजेल अशी अद्ययावत यंत्रणा बसविण्यात आली आहे. पानेवाडी येथे भारत पेट्रोलियमबरोबर इंडियन ऑयल, हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांच्याही प्रकल्पांत उच्च क्षमतेच्या टाक्यांमध्ये मुंबईहून इंधनवाहिनीमधून आलेले हे इंधन साठविले जाते. टँकरद्वारे रस्तामार्गाने मराठवाडा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्रासह छत्तीसगडपर्यंत इंधनाचे टँकर, लोहमार्गाद्वारे वितरण केले जाते. १९९९ मध्ये ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर १८ वर्षांत तीन वेळा अशा प्रकारे इंधन गळती झाल्याचे सांगितले जाते. १५ वर्षांपूर्वी अशाच प्रकारे इंधनगळती पानेवाडी प्रकल्पानजीक नागपूर येथे झाली होती. त्यामुळे तेथील बरीच जमीन नापीक झाली. त्याची दक्षता घेऊन कंपनीने तेथे प्रतिबंधक यंत्रणा उपलब्ध करून देखभालीसाठी मानवी मनोराही उभारला आहे.

इंधनटंचाई भेडसावणार नाही

इंधनगळतीची घटना झाल्यानंतर तातडीने सक्षम यंत्रणेमार्फत ती थांबविण्यात आली. पहाटेपर्यंत इंधनवाहिनी पूर्ववत सुरू होण्याची शक्यता आहे. भारत पेट्रोलियम पानेवाडी प्रकल्पात पुरेसा पेट्रोल, डिझेलचा साठा असल्याने इंधनपुरवठय़ावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाही. टँकर्स भरण्याचे काम नियमितपणे सुरू आहे.

डी. एम. पानझाडे (प्रकल्प प्रमुख, भारत पेट्रोलियम, पानेवाडी, मनमाड)