केबीसी घोटाळा प्रकरण

बहुचर्चित केबीसी घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती यांच्या बँकेतील तीन लॉकरच्या चाव्या न सापडल्याने ते उघडण्याची प्रक्रिया आता मंगळवारी होणार आहे. बँकेकडूनही चाव्या उपलब्ध न झाल्यास नकली चावी बनवून ते लॉकर उघडणे अथवा त्याचे टाळे तोडणे हे पर्याय पोलीस यंत्रणेसमोर आहेत.

केबीसीच्या भ्रामक साखळी योजनांद्वारे राज्यातील गुंतवणूकदारांची शेकडो कोटींची फसवणूक करणारा मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. मुख्य संशयित ताब्यात आल्यामुळे या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा तपास यंत्रणेचा प्रयत्न आहे. केबीसीच्या संचालकांची ८० कोटींची स्थावर मालमत्ता व बँक खात्यातील रक्कम आधीच जप्त करण्याची कारवाई केली गेली आहे. भाऊसाहेब व त्याच्या पत्नीच्या तपासात संबंधितांचे बँकेतील तीन नव्या लॉकरची माहिती पुढे आली. या लॉकरमध्ये नेमके काय आहे याची छाननी सोमवारी करण्यात येणार होती; परंतु ग्राहकाकडे जी चावी असते, ती न सापडल्याने ते उघडण्याची प्रक्रिया करता आली नाही. संशयित भाऊसाहेब व पत्नीकडे असणाऱ्या लॉकरच्या चाव्या न सापडल्याने तपास यंत्रणा दुसरी चावी बनवून ते उघडण्याचा विचार करत आहे. अन्यथा लॉकरचे टाळे तोडून ते उघडणे क्रमप्राप्त ठरणार आहे. मंगळवारी यापैकी एक पर्याय निवडून लॉकर उघडले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, केबीसी घोटाळ्याची व्याप्ती आणि मुख्य सूत्रधार भाऊसाहेबची मालमत्ता या सर्वाची सांगड घालण्याचे काम केले जात आहे. भाऊसाहेबच्या जबाबात अन्य काहींची नावे पुढे येत असल्याने संशयितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.