‘बंद’मुळे जनजीवन विस्कळीत

भीमा-कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी पुकारलेला बंद जिल्ह्य़ात काही किरकोळ घटनांचा अपवाद वगळता शांततेत पार पडला. रास्ता रोको, दगडफेक,  बसेसचे नुकसान आदी घटनांमुळे काही तणावपूर्ण होते.   बस, रिक्षा-टॅक्सी वाहतूकही बंद राहिल्याने नागरिकांसह बाहेरगावहून आलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

भीमा-कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचे पडसाद आदल्या दिवशीच शहर-ग्रामीण भागात उमटले होते. या पाश्र्वभूमीवर, पोलिसांनी वाढीव कुमक तैनात करत अनुचित प्रकार घडणार नाही याकडे लक्ष दिले. रात्रीच शालिमार चौकातील आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे जाणारे रस्ते लोखंडी जाळ्या लावून तात्पुरते बंद केले. प्रमुख चौकांमध्ये पोलीस तैनात होते.   नाशिकरोड, विहितगाव, द्वारका, सातपूर परिसरात तणावपूर्ण शांतता होती. मुख्य बाजारपेठेचा परिसर असलेला महात्मा गांधी रोड, मेनरोड, शालिमार, अशोक स्तंभ आदी भागातील दुकाने बंद होती. वाहतुकीचे प्रमाण तुरळक होते. शहर, ग्रामीण बस वाहतूक आणि रिक्षा-टॅक्सी वाहतुकही थंडावली होती. शाळा-महाविद्यालयांना सुटी नव्हती. परंतु, अनेकांनी जाणे टाळले. शालेय विद्यार्थी वाहतूक बंद असल्याने शाळांमध्ये शुकशुकाट होता. बंदमधून रुग्णालय, औषध दुकाने अशा अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या.

नाशिकरोडला तणावपूर्ण वातावरणात बंदला सुरूवात झाली. आम्रपाली झोपडपट्टीलगत जमाव जमल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेत स्थिती नियंत्रणात आणली. संवेदनशील विहितगाव, आम्रपाली झोपडपट्टी, देवळाली गाव, रोकडोबा वाडी, भीमनगर, सिन्नर फाटा आदी ठिकाणी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला. विहितगाव येथे जमावाने केलेल्या दगडफेकीत दुचाकीवरील युवक जखमी झाला. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी युवकाच्या खिशात ओळखपत्र नसल्याने त्याची ओळख पटू शकलेली नाही. दुपारी नाशिकरोड भागात मोर्चा काढण्यात आला.

द्वारका चौकात दुपारी बारा वाजेपासून शेकडोंच्या जमावाने ठिय्या देऊन नाशिक-पुणे आणि मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक बंद पाडली. उड्डाण पुलाखाली आंदोलन सुरू असले तरी पुलावरून मुंबई व धुळ्याकडे मार्गस्थ होणाऱ्या वाहतुकीला अडथळा आला नाही. शहरवासीयांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला. जमावाकडून घोषणाबाजी, शिवीगाळ सुरू असली तरी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याची तक्रार वाहनधारकांनी केली. अनेक रस्त्यांवरून दुचाकीवर युवकांचे जत्थे घोषणाबाजी आणि बंदचे आवाहन करत फिरत होते. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. जिल्हाधिकारी कार्यालय, अशोकस्तंभ येथून मोर्चा काढण्यात आला. बंदमुळे शहर-ग्रामीण भागातील कोटय़वधींचे व्यवहार ठप्प झाले. बहुतांश बाजार समित्यांचे कामकाजही ठप्प होते.

मराठा क्रांती मोर्चातर्फे निषेध

भीमा-कोरेगाव येथील हल्ला दुदैवी असून त्याचा संपूर्ण मराठा समाजाच्यावतीने निषेध करण्यात आला आहे. भीमा-कोरेगाव येथे घडलेल्या घटनेमागे कोणत्या अपप्रवृत्ती आहेत, याचा शोध लावून ते कोणत्याही समाज, जाती, धर्म, पक्ष वा संघटनेचे असो, त्यांना शासन झाले पाहिजे, अशी मागणी मराठा समाज, मराठा संघटना, मराठा क्रांती मोर्चा यांच्यावतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाईची मागणी करण्यात आली. समाज माध्यमांवर दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल अशा पोस्ट पसरविल्या जात आहेत. शांतता अबाधित राखण्यासाठी वातावरण बिघडविण्याचे प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

ठळक घटना

  • मुंबई-आग्रा आणि नाशिक-पुणे मार्गावर द्वारका चौकात चार तास रास्ता रोको
  • प्रमुख बाजारपेठेतील दैनंदिन व्यवहार ठप्प
  • शहर-ग्रामीण भागातील बस, रिक्षा, टॅक्सी सेवा बंद
  • विहितगावात दगडफेकीत दुचाकीस्वार जखमी
  • ठक्कर बसस्थानकात शिवशाही बसच्या काचा फोडल्या
  • ठक्कर बसस्थानकात शाळांमध्ये शुकशुकाट

प्रवाशांचे प्रचंड हाल

एसटी बससेवा आणि रिक्षा वाहतुकही पूर्णत: बंद झाल्याने शहरवासीयांसह बाहेरगावहून आलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडय़ांची वाहतूक सुरू होती.  या गाडय़ांमधून नाशिक मध्ये उतरणाऱ्या प्रवाशांना शहरातील स्थितीची माहिती  नसल्याने शेकडो प्रवासी परिसरात अडकून पडले. शासकीय, निमशासकीय कर्मचारी, औद्योगिक वसाहतीतील कामगारांचेही हाल झाले. नाताळ सुटीनिमित्त आलेल्या पर्यटकांना बाहेर जाण्याकरिता बससेवा उपलब्ध नव्हती. बहुतांश हॉटेल, खाद्य पदार्थ विक्रेत्यांची दुकाने बंद असल्याने प्रवाशांना उपाशी पोटे राहावे लागले.   बंदच्या पाश्र्वभूमीवर, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी वाहतुकदारांनी आपली वाहने बाहेर आणली नाहीत. काही शाळांच्या सकाळच्या सत्रात सुरू असलेल्या बसगाडय़ाही दुपारी बंद ठेवण्यात आल्या. शाळांना अधिकृत सुटी नव्हती. बहुतांश पालकांनी मुलांना शाळेत पाठविले नाही.

एसटीचे एक कोटीचे नुकसान

दरात शहरासह ग्रामीण भागात प्रवासी वाहतुकीची धुरा सांभाळणाऱ्या एक हजार बसगाडय़ांना या दिवशी ‘ब्रेक’ लागला. आदल्या दिवशी काही बसगाडय़ांची तोडफोड झाली असताना बंदच्या दिवशी तसेच काही प्रकार घडले.  अधिक नुकसान टाळण्यासाठी बुधवारी एसटी बससेवा पूर्णत: बंद ठेवण्यात आली. शहर आणि ग्रामीण भागात महामंडळाचे एकूण १३ आगारांचे दैनंदिन एक कोटीहून अधिक रुपयांचे उत्पन्नावर पाणी सोडावे लागले. जिल्ह्य़ातील एक हजार बसगाडय़ा जागेवर उभ्या राहिल्याने उपलब्ध आगारांमध्ये जागा देखील कमी पडली. निफाड तालुक्यात जमावाने बसच्या काचा फोडल्या. तसाच प्रकार ठक्कर बाजार स्थानकातही घडला. दुपारच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या युवकांनी शिवशाही बसच्या काचा फोडून पलायन केले. बाहेरगावहून येणाऱ्या काही बसची तोडफोड झाल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.   मालेगाव येथे शेकडो जणांनी एकत्रितपणे प्रशासनाला निवेदन देऊन भीमा-कोरेगाव येथील घटनेतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.

ग्रामीण भागांतही प्रतिसाद

ग्रामीण भागातही बंदला प्रतिसाद मिळाला.  जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार इगतपुरीत कडकडीत बंद पाळण्यात आला. दिंडोरीसह मोहाडी, वणी उमराळे येथेही दैनंदिन व्यवहार बंद होते. सटाणा तालुक्यात सटाणा शहरासह नामपूर, जायखेडा येथे बाजारपेठेतील दुकाने बंद होती.  पिंपळगाव, लासलगाव, नांदगाव येथील बाजार समित्यांसह मुख्य बाजारपेठेतील दुकानेही बंद होती. येवल्यात तणावपूर्ण शांतता होती. मनमाडमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही कडकडीत बंद

पाळण्यात आला. संतप्त भिमसैनिकांनी शहरातून मोर्चा काढला. मनमाड-मालेगाव राज्यमार्गावर रस्त्यावर उतरून निदर्शने करण्यात आली. काही बसेसवर दगडफेकही झाली.  बाजारपेठेत  मोर्चेकरी आणि व्यापारी यांच्यात शाब्दीक वाद झाले. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. शिवीगाळ करण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी या घटनेचा निषेध करून पोलीस ठाण्यात निवेदन दिले. मनमाड बस स्थानकातून बससेवा पूर्णपणे बंद होती. सुरगाणा, पेठ या आदिवासीबहुल भागात मात्र, दैनंदिन व्यवहार नियमितपणे सुरू होते.