पहिल्या पर्वणीतील कडक बंदोबस्त आणि भाविकांची घटलेली संख्या हा विषय अजूनही चर्चेत असून या पाश्र्वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुढील पर्वण्यांचा देशभर प्रचार आणि प्रसार करण्यासह सिंहस्थामध्ये आपण स्वत: लक्ष द्यावे, असे साकडे घातले. नाशिककरांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडत त्यांनी काही सूचनाही केल्या. सुरक्षेच्या अतिरेकामुळे पहिल्या पर्वणीत राज्याने पर्यटनाच्या माध्यमातून मिळणारा हजारो कोटी रुपयांचा महसूल गमावल्याचेही त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
पहिल्या पर्वणीत प्रशासनाचे नियोजन चुकल्यामुळे झालेल्या चुकांबाबत बैटकीत चर्चा करण्यात आली. उर्वरीत दोन पर्वण्यांसाठी वाहनविरहित भाग अर्धा ते एक किलोमीटरपेक्षा अधिक नसावा, मुंबई, पुणे, औरंगाबाद, धुळे, वापी, सापुतारा, आदी रस्त्यांवरून येणारी प्रवासी वाहने नाशिकला येताना अडविण्यात येऊ नयेत, शहरातील महामार्ग व उड्डाणपुलावरील वाहतूक सुरू ठेवावी, शहरातील दूध पुरवठा, भाजीपाला, हॉटेल, रेस्टॉरंटसह सर्व दुकाने सुरळीत सुरू ठेवावी, रामकुंड-गोदाघाट वगळता इतरत्र अडथळे उभे करू नयेत, या नाशिककरांच्या मागण्या भुजबळांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.
अतिरेकी सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे नाशिककर व भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे पहिल्या पर्वणीला त्याचा फटका बसल्याचे भुजबळांनी नमूद केले. देशातील लाखो भाविक मुंबईमार्गे नाशिक व त्र्यंबकेश्वरकडे जातात. परंतु पर्वणीत नाशिककडे जाणाऱ्या गाडय़ा भिवंडीच्या पुढे रोखण्यात आला.
नाशिकमध्ये अत्यावश्यक सेवांची म्हणजेच दूध, भाजीपाला यांसारख्या जिवनावश्यक असलेल्या वस्तुंच्या गाडय़ांनाही तीन दिवस बंदी करण्यात आली. शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट तसेच नारळ, फुले व पूजेचे सामान असणारी दुकानेही बंद करण्यात आली.
शहरात वाहनांना बंदी असल्याने स्थानिकांचे हाल झाले. विशेष म्हणजे स्मशानभूमीही बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे स्थानिकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे त्योंनी नमूद केले. रक्षा बंधनसाठीही नागरिकांना घराबाहेर पडता आले नाही.
गोदाघाटापासून सात ते आठ किलोमीटर दूर भाविकांना सोडण्यात आल्याने मुले व बॅगा सांभाळत नागरिकांना पायपीट करावी लागली. रस्त्यात हॉटेल तसेच टपऱ्याही बंद असल्याने त्यांचे अधिकच हाल झाले. पर्वणीच्या काळात नाशिकला येऊ नका, असा नकारात्मक प्रचार केल्यामुळे नाशिक कुंभमेळ्याची जगभर ‘ब्रँडींग’ करण्याची संधी गमावली, अशी तक्रारही भुजबळ यांनी केली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी भुजबळ यांना सकारात्मक प्रतिसाद दिला.