धुळ्यात अनील गोटे समर्थकांकडून आनंदोत्सव

माजी खासदार समीर भुजबळ यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनाही सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व भुजबळ समर्थकांनी ठिकठिकाणी आंदोलन केले. रस्त्यावर पेटते टायर फेकणे, खा. किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, रास्ता रोको यासह काही गावात बंद पाळण्यात आला. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्य़ात भाजप आमदार अनील गोटे समर्थकांनी अटकेच्या कारवाईचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले. सोमवारी रात्री भुजबळ यांना अटक झाल्याची माहिती समजल्यानंतर नाशिक जिल्ह्य़ात पडसाद उमटण्यास सुरूवात झाली.

स्थानिक पातळीवर पडसाद उमटतील हे गृहीत धरून पोलीस यंत्रणा कामास लागली. महामार्गावरील राष्ट्रवादी भवन परिसरात बंदोबस्त तैनात करताना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली. सकाळपासून शहर व ग्रामीण भागात आंदोलनाचे सत्र सुरू झाले. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर ओझर, नाशिक शहरात मध्यवर्ती बसस्थानक चौक या ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. द्वारका चौकात काही कार्यकर्त्यांनी पेटते टायर रस्त्यावर फेकले. मुंबई नाका येथे खा. किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड लगेच सुरू केली. खबरदारीचा भाग म्हणून एन. डी. पटेल रस्त्यावरील भाजप कार्यालयास पोलीस संरक्षण देण्यात आले. मनमाड-शिर्डी रस्त्यावर अर्धा तास रास्ता रोको करत वाहतूक बंद पाडण्यात आली. येवला तालुक्यातील अंदरसूलसह काही गावांत बंद पाळण्यात आला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे त्र्यंबक रस्त्यावरील तळेगाव फाटा येथे आंदोलन करण्यात आले. देवळा येथे पाचकंदील चौकात राष्ट्रवादी काँग्रेस व समता परिषदेतर्फे रास्ता रोको आंदोलन करत युती शासनाचा निषेध केला. उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्णाात अटकेच्या कारवाईचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. भाजपचे आ. अनील गोटे समर्थकांनी भुजबळांच्या अटकेचे वृत्त समजल्यानंतर जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.