News Flash

भुजबळ समर्थकांचे जिल्हाभर आंदोलन

छगन भुजबळ यांनाही सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्याचे तीव्र पडसाद मंगळवारी जिल्ह्यात उमटले.

द्वारका येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पेटते टायर रस्त्यात फेकले. छायाचित्रे : मयुर बारगजे

मुंबई-आग्रा महामार्ग, मनमाड-शिर्डी रस्त्यावर रास्ता रोको, गावांमध्ये कडकडीत बंद
माजी खासदार समीर भुजबळ यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनाही सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्याचे तीव्र पडसाद मंगळवारी जिल्ह्यात उमटले. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग आणि मनमाड-शिर्डी रस्त्यावर रास्ता रोको, येवला व नांदगाव मतदारसंघातील काही गावात कडकडीत बंद, नाशिक शहरात भाजपचे खा. किरीट सोमय्या यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन आणि आंदोलन.. याद्वारे कार्यकर्त्यांनी भुजबळ यांच्या अटकेचा निषेध नोंदविला. पोलिसांनी अनुचित प्रकार घडू नये म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड करताना भाजपच्या कार्यालयाभोवती कडेकोट पहारा ठेवला.
सोमवारी रात्री आ. भुजबळ यांना अटक झाल्याचे वृत्त आल्यानंतर लगेचच स्थानिक पातळीवर त्याचे पडसाद उमटू लागले. रात्री मुंबई नाका व अन्य काही भागांत पेटते टायर रस्त्यावर फेकण्यात आले. महामार्गावर काही ठिकाणी एसटीवर दगडफेक झाल्याचे सांगितले गेले. परंतु, त्यास यंत्रणेकडून दुजोरा मिळाला नाही. नाशिक हा कधीकाळी भुजबळ यांचा बालेकिल्ला. भुजबळ यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय समता परिषदेचे हे मुख्यालय. यामुळे नाशिकमध्ये पडसाद उमटणार हे गृहीत धरून पोलीस यंत्रणा कामाला लागली. महामार्गावरील राष्ट्रवादी भवन परिसरात बंदोबस्त तैनात करताना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली. सकाळी स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. तोपर्यंत ठिकठिकाणी आंदोलनाचे सत्र सुरू झाले होते. ओझर येथे महामार्गावर आंदोलन करत असताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. नाशिक शहरात मध्यवर्ती बसस्थानक चौकात शेकडो कार्यकर्त्यांनी रास्तारोको केला. द्वारका चौकात काही कार्यकर्त्यांनी पेटते टायर रस्त्यावर फेकले. मुंबई नाका येथे खा. किरीट सोमय्या यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न झाला. शहरात ठिकठिकाणी गनिमी काव्याने आंदोलन झाले. सीबीएस चौकातील आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे शहराची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. मेहेर चौकातून सीबीएसकडे येणारी वाहतूक शालिमारमार्गे वळवली. परंतु, अंतर्गत काही रस्त्यांवर दुरुस्तीची कामे सुरू असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी झाली.
पोलीस यंत्रणा सकाळपासून सतर्क असल्याने आंदोलकांची लगेचच धरपकड सुरू झाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यालयास लक्ष्य केले जाऊ नये म्हणून एन. डी. पटेल रस्त्यावरील कार्यालयास पोलीस संरक्षण देण्यात आले. भुजबळ कुटुंबीय तपासाला पूर्ण सहकार्य करीत असताना चौकशीसाठी बोलावून सक्तवसुली संचालनालयाने त्यांना अटक केली. राजकीय हेतूने प्रेरित ही कारवाई असून भुजबळ यांच्या बदनामीसाठी हे षड्यंत्र रचण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. भाजप सरकारला आतापर्यंत कोणतेही विकासात्मक काम करता आलेले नाही. आपली निष्क्रियता लपविण्यासाठी शासनाने ही कारवाई केल्याची तक्रार करण्यात आली. मनमाड-शिर्डी रस्त्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व भुजबळ समर्थकांनी अर्धा तास रास्ता रोको करत वाहतूक बंद पाडली. या आंदोलनामुळे राज्य मार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या. तत्पूर्वी, कार्यकर्त्यांनी शहरातून मोर्चा काढला. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आंदोलन झाले. येवला तालुक्यातील अंदरसूलसह काही गावांमध्ये मोर्चा काढून कडकडीत बंद पाळण्यात आला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे त्र्यंबक रस्त्यावरील तळेगाव फाटा येथे आंदोलन करण्यात आले. देवळा येथे पाचकंदील चौकात राष्ट्रवादी काँग्रेस व समता परिषदेतर्फे रास्ता रोको आंदोलन करत युती शासनाचा निषेध करण्यात आला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2016 4:00 am

Web Title: bhujbal supporters protest in nashik over his arrest block mumbai agra highway
Next Stories
1 फुलपाखरांची घटती संख्या चिंताजनक
2 ‘सिक्कीममध्ये मुलीचा जन्म झाल्यावर आनंदोत्सव’
3 सुर्वे वाचनालयाच्या ‘माझे विद्यापीठ’चा प्रवास खडतर
Just Now!
X