बिबटय़ाच्या मुक्त संचारामुळे सातत्याने दहशतीखाली वावरणाऱ्या निफाड तालुक्यात मंगळवारी पुन्हा बिबटय़ाने घरात शिरून हल्ला चढवत तीन जणांना जखमी केले. या वेळी एकाने प्रसंगावधान राखत कुटुंबातील सदस्यांना बाहेर काढून बिबटय़ाला घरात डांबल्याने अनर्थ टळला. या बिबटय़ाला नंतर वन विभागाने ताब्यात घेतले.

मागील काही वर्षांपासून निफाड तालुक्यात बिबटय़ाचा उपद्रव वाढला आहे. मंगळवारी टाकळी विंचूर येथील घटनेने त्यात नव्याने भर पडली. टाकळी विंचूर येथे पुंजाबा सुरशे यांच्या घरात हा प्रकार घडला. पहाटे एक सदस्य घराबाहेर गेला होता. त्या वेळी बिबटय़ा त्याच्या मागोमाग घरात शिरला आणि झोपेत असणाऱ्यांवर त्याने हल्ला चढविला. अचानक झालेल्या या हल्ल्यात पुंजाबा सुरशे, देवीदास सुरशे व बाळसाहेब सुरशे हे जखमी झाले. या वेळी विक्रम सुरशेने प्रसंगावधान राखून सदस्यांना क्षणाचाही विलंब न करता बाहेर काढले. बिबटय़ा घरात असताना बाहेरून लगेच दार बंद करत त्याने सर्वाचे प्राण वाचविले. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब भयभीत झाले.

याची माहिती आसपासच्या ग्रामस्थांसह वन विभागाला कळविण्यात आली. बिबटय़ा घरात जेरबंद झाल्याचे ऐकून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. बिबटय़ा घरात असल्याने ग्रामस्थांनी सुरशे यांच्या घराजवळ गर्दी केली होती. वन विभागाने बिबटय़ाला पिंजऱ्यात बंद करत ताब्यात घेतले.जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बिबटय़ाला या पद्धतीने घरात जेरबंद करण्याची जिल्हय़ातील ही बहुधा पहिलीच घटना. कुटुंबातील तीन सदस्यांना जखमी केले असताना विक्रमने धाडसाने ही कामगिरी पार पाडली. मागील काही वर्षांत निफाड तालुक्यात घडलेल्या बिबटय़ाच्या हल्ल्यांत काही जणांना प्राण गमवावे लागले आहेत. परिसरात बिबटय़ांचा उपद्रव वाढत असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

(((   संग्रहित छायाचित्र. ))