प्रकाश आळेकर ‘घाटाचा राजा’

सांगलीचा राष्ट्रीय खेळाडू दिलीप माने रविवारी येथे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ न्यासच्या शतकपूर्ती निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय सायकल स्पर्धेत खुल्या १०० किलोमीटर गटाचा विजेता ठरला. त्याने दोन तास ५८ मिनिटे आणि २१ सेकंदात हे अंतर पूर्ण केले. द्वितीय क्रमांक मुंबईचा मिहिर जाधव, तर ‘घाटाचा राजा’ किताबासह सांगलीच्या प्रकाश आळेकरने तृतीय क्रमांक पटकावला.

नाशिक जिल्हा सायकलिंग संघटनेच्या मान्यतेने विविध आठ गटांत स्पर्धा झाली. स्पर्धेत राज्यातील पाचशेपेक्षा अधिक सायकलपटूंनी सहभाग घेतला. पोलीस अधीक्षक संजय दराडे, रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव प्रताप जाधव, महाराष्ट्रचे सचिव संजय साठे, नाशिकच्या संघाचे प्रशिक्षक लिलाधर शेट्टी आदी उपस्थित होते.

स्पर्धकांच्या हस्ते चांदीच्या गणपतीची आरती झाल्यानंतर स्पर्धेचे उद्घाटन झाले. सर्व गटांच्या स्पर्धा त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील पपया नर्सरीपासून सुरू झाल्या. खुल्या १०० किलोमीटर गटासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर-आंबोली घाट-पवार वाडी आणि त्याच मार्गाने रेशीमगाठ लॉन्स असा स्पर्धेचा मार्ग होता. मुलींच्या ४० किमी गटात अहमदनगरची प्रणिता सोमण ५८ मिनिटे, २८ सेकंदासह प्रथम आली. पुण्याची अंजली रानावले (एक तास, दोन मिनिटे), सांगलीची प्रियंका करंडे (एक तास, दोन मिनिटे, सात सेकंद) यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला. सतरा वर्षांआतील १५ किमी स्पर्धेत मुलांमध्ये नाशिकचा निसर्ग भामरे, मुलींमध्ये करिना देवरे प्रथम आली.

इतर गटांमध्ये-१५ किमीसाठी ४० ते ५० वर्ष वयोगटात समीर नार्वेकर, ५० वर्षांवरील गटात मरियम डिसुझा, चार किमीसाठी १० वर्षांआतील वयोगटात पुण्य मकवाना, सात किमीसाठी १२ वर्षांआतील गटात शौर्य मकवाना (मुंबई), मुलींमध्ये ऋतू भामरे (नाशिक), १० किमीसाठी १४ वर्षांआतील गटात सोहम नागरे (नाशिक), किना गावित यांनी प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ, नाशिक जिल्हा सायकलिंग संघटना, नाशिक सायकलिस्टच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.

नाशिकचे वातावरण सायकलिंगसाठी उत्तम असून येथे स्पर्धेसाठी येण्यास नक्कीच आवडेल. घाटातील रस्ता बराच खराब असल्याने अडचणी आल्या, परंतु त्याशिवाय स्पर्धेला रंगतदेखील आली नसती  -प्रकाश आळेकर (घाटाचा राजा)