डोळ्याचे पारणे फेडणारी कलाकृती..

घराघरांपुढे काढलेली रांगोळी चिमुकल्यांपासून थोरांचे लक्ष वेधणारी ठरते. महिलांसाठी तर हा जिव्हाळ्याचाच विषय. डोळ्याचे पारणे फेडेल अशी तब्बल ७५ फुटी महाकाय गुढी रांगोळी रश्मी विसपुते यांनी येथील लक्षिका मंगल कार्यालयात साकारली असून सोमवारी या गुढी रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार यांच्या हस्ते करण्यात आले.

वृंदा लव्हाटे यांच्या विशेष सहकार्यातून रश्मी यांनी गुढी रांगोळी साकारली आहे. उद्घाटन कार्यक्रमास रांगोळी कलाकार रश्मी यांच्यासह वंडर बुक ऑफ रेकॉर्डच्या वरिष्ठ समन्वयक अमी छेडा, अहिर सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दिंडोरकर, हरिओम सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष श्यामराव बिरारी यांच्यासमवेत इनरव्हील क्लब ऑफ गेन-नेक्स्टच्या अध्यक्षा दीपाली चांडक, डॉ. मीनल पलोड, सरोज दशपुते आदी उपस्थित होते.

सोनार यांनी अशा स्वरूपाच्या उपक्रमांमधून पारंपरिक कलाप्रकारांना चालना मिळून ते नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यास मदत होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अमी छेडा यांनी वंडर बुक ऑफ रेकॉर्डविषयीची माहिती उपस्थितांना दिली. इनरव्हील क्लब ऑफ जेन नेक्स्ट या संस्थेसमवेत विश्वास बँक, डब्ल्यूडी वर्ल्ड, साईशा अ‍ॅग्रो, सोनी पैठणी यांचे उपक्रमासाठी प्रायोजकत्व लाभले आहे.

या महाकाय रांगोळीची नोंद ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये होण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. ही महाकाय गुढी रांगोळी पाहण्यासाठी भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रदर्शन ११ एप्रिलपर्यंत रसिकांसाठी खुले असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी १० वाजता महेंद्र जगताप यांचे सुलेखन प्रात्यक्षिक होणार असून सायंकाळी पाच वाजता यतीन पंडित, संदीप लोंढे यांचे शिल्प साकारण्याचे प्रात्यक्षिक होईल. गुरुवारी श्रीरामपूर येथील डी. डी. कचोळे माध्यमिक विद्यामंदिरचे विद्यार्थी प्रत्यक्ष निसर्गचित्रण करतील. यासह इतर विविध कार्यक्रम होणार आहेत. सौदर्याबरोबरच भव्य असणाऱ्या या रांगोळी शिल्पाचा वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.