वैद्यकीय अधिकारीपदासाठी प्रतिसादाकडे लक्ष 

नाशिक : शहरात करोनाचा उद्रेक झाला असतांना त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे. रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा भासत असल्याने महापालिकेने आरोग्य विभागात १५ विविध पदांसाठी ८११ जणांची मानधन तत्वावर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यात विशेष तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी पदांसह परिचारिका, प्रयोगशाळेतील संबंधित तंत्रज्ञ आदींचा अंतर्भाव आहे. दुसरीकडे अन्य पदांसाठी महापालिकेत गर्दी झाल्याचे पहिल्या दिवशी पाहायला मिळाले.

शहरात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून बाधित रुग्णांना महापालिका, सरकारी रुग्णालयात खाटा मिळणे अवघड झाल्याच्या तक्रारी  आहेत. एकूण रुग्णसंख्येने सहा हजाराचा टप्पा ओलांडला आहे. त्यातील ४२८५ रुग्णांना घरी सोडण्यात आले. करोनामुळे २१६ जणांचा मृत्यू झाला. महापालिकेच्या आरोग्य विभागात पुरेसे कर्मचारी नाहीत. करोनासाठी तातडीने डॉक्टर, परिचारिका आणि आवश्यक ते कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी शिवसेने केली होती. ही मागणी मान्य करत पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तातडीने थेट मुलाखतीद्वारे मानधनावरील भरती प्रक्रियेला सुरूवात केल्याकडे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी लक्ष वेधले.

आजवरचा अनुभव लक्षात घेता आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी महापालिकेला अनेकदा जाहिरात द्यावी लागली होती. महापालिका रुग्णालयात राजकीय दबावाला तोंड द्यावे लागत असल्याने डॉक्टर काम करण्यास तयार नसतात.

करोना काळात वैद्यकीय अधिकारी पदासाठीच्या भरतीला कसा प्रतिसाद मिळेल याकडे प्रशासनाचे लक्ष आहे. अन्य पदांसाठी इच्छुकांची गर्दी झाली आहे. पहिल्याच दिवशी मुलाखतीसाठी आलेल्यांनी मुख्यालयाचा तिसरा मजला गजबजलेला होता.

१७९ वैद्यकीय अधिकारी

करोना साथरोगाच्या कालावधीसाठी मानधन तत्वावर ही भरती होईल. त्या अंतर्गत फिजिशियन, रेडिओलॉडिस्ट, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) मानसोपचार तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, आयुष (बीएएमएस) वैद्यकीय अधिकारी अशी १७९ पदांची भरती केली जाईल. तर उर्वरित पदे परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, मिश्रक, रेडिओग्राफर, आहारतज्ज्ञ, समुपदेशक, एएनएम, आरोग्य सेवक यांची आहेत. महापालिकेच्या मुख्यालयात सरळ मुलाखतीद्वारे ही प्रक्रिया राबविली जात आहे. फिजिशियन पदासाठी दीड लाख रुपये मानधन दिले जाणार आहे. तर एमबीबीएस डॉक्टरांना ६० तर बीएएमएस पदवी धारकांना ४० हजार रुपये मानधन देण्याची महापालिकेची तयारी आहे.