एरवी बालगीतात हरवलेले ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती..’ हे शब्द आणि त्याची अनुभूती पर्यावरणप्रेमी नाशिककर सध्या घेत आहेत. त्यास निमित्त ठरले, नेचर क्लब ऑफ नाशिकच्या वतीने अंबड-लिंक रोडवरील प्रबोधिनी विद्यामंदिर येथे आयोजित पक्ष्यांच्या शाळेचे. हा अनोखा उपक्रम तीन महिन्यांपासून राबविला जात असून पहिल्या पावसापर्यंत हे वर्ग नियमित भरणार आहेत.

या बाबतची माहिती क्लबचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा यांनी दिली. सध्या तापमानाचा वाढता पारा आणि पाणीटंचाई यामुळे नागरिकांचे स्थलांतर होत असताना जैवसंपदेचा भाग असलेले मुके प्राणी-पक्षीही आपल्या बचावासाठी स्थलांतराला प्राधान्य देत आहे. पक्ष्यांचे स्थलांतर आणि कारणांचा विचार करत नेचर क्लब ऑफ नाशिकने प्रबोधिनी विद्यामंदिरच्या वसतिगृहातील जागेत ‘पक्ष्यांची शाळा’ या अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली. जागा निश्चित झाली तशी शालेय साहित्याची जमवाजमवही सुरू झाली. त्यासाठी टाकाऊतून टिकाऊ या संकल्पनेवर क्लबच्या सदस्यांनी पुढाकार घेत पाण्याच्या फेकून दिलेल्या बाटल्या, रिकाम्या तेलाच्या कॅन, नारळाच्या करवंटय़ा, लाकडी घरटी, टायर यासह अन्य साहित्य जमवत कामाला सुरुवात केली. रिकाम्या बाटल्या विशिष्ट आकारात कापण्यात आल्या तसेच टायरचे छोटे छोटे तलाव करण्यात आले. हे साहित्य परिसरातील वेगवेगळ्या वर्गात अर्थात आंबा, चिकू, फणस, वड, फालसा, चाफा, गुलमोहर आदी झाडांवर तारेच्या साहाय्याने लावण्यात आले. त्यात शेंगदाणे, विविध फळे, बिया, फरसाण असे खाद्य ठेवण्यात आले. दिवसाला पाणी आणि जेवणाच्या सामानात भर घातली गेली. शाळेची सजावट पाहता बुलबुल या पक्ष्याने शाळेत पहिले नाव नोंदवत वर्गात खाद्यपदार्थ चाखत अभ्यासाला सुरुवात केली. त्या पाठोपाठ दयाळ, किंगफिशर, तांबट, सनबर्ड, चष्मेवाला, कोकिळ, कावळा, डव, नाचरा, फ्लायकॅचर, कबूतर, भारद्वाज, वटवटय़ा, शिंपी यासह ३० पक्ष्यांनी वर्गात नोंदणी केली आहे. दरम्यान, शाळेच्या पहिल्या दिवसापासून क्लबचे सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी पक्ष्यांचे निरीक्षण करत त्यांचे जीवनमान, वातावरणाचा त्यांच्यावर होणारा परिणाम, त्यांचे स्वभाव यासह अन्य काही महत्त्वाच्या नोंदी घेण्यास सुरुवात केली.

demat accounts touch 15 crore in march 2024
डिमॅट खाती पहिल्यांदाच १५ कोटींच्या पुढे
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
koradi police station, Nagpur, case registered, Sexual abuse, minor girl
धक्कादायक! नागपूरात नऊ महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

गंमत म्हणजे बुलबुल पक्ष्यांमधील भांडण, त्यांची ‘फ्री स्टाईल’ मातीवरील कुस्ती, तांबट पक्ष्याची सकाळी गुलमोहरांवरून घातलेली शीळ, रॉबिन पक्ष्याने जमिनीवर शेपूट वर करत सादर केलेला नृत्याविष्कार यामुळे शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनाची तयारी होत असल्याचा भास उपस्थितांना होतो. टायरपासून केलेल्या कृत्रिम तलावात खारूताई, बेडूक आणि चक्क साप यांनीही हजेरी लावली. जास्वंदामधून रस पिणारा सूर्यपक्षी, होला या पक्ष्याचे अंडे पळवणारी कोकिळा हे सर्व शाळेत बघावयास मिळत आहे. शाळा सुरू होण्यासाठी आणि सुरू राहण्यासाठी क्लबच्या प्रा. बोरा यांच्यासह भीमराव राजोळे, सागर बनकर, आशीष बनकर, आकाश जाधव, दर्शन घुगे, धनंजय बागड, रोहित नाईक, प्रबोधिनीच्या रजनीताई लिमये प्रयत्नशील आहेत.

तीन महिन्यांपासून ही शाळा सुरू असून पहिल्या पावसापर्यंत हे वर्ग सुरू राहणार आहेत. ही शाळा परसबाग तसेच घरातील बाल्कनीमध्येही सुरू करता येईल. यासाठी पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. लवकरच सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम राबविला जावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रा. बोरा यांनी सांगितले.