वसंत गीते यांचा आंदोलनाचा इशारा
शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाखालील इंदिरानगरकडून गोविंदनगरकडे जाणारा बंद केलेला बोगदा सुरू करण्यासंदर्भातील हालचालींना वेग आला असून, राज्यातील सत्ताधारी भाजपचे लोकप्रतिनिधी आणि नेते त्यासाठी अधिक पुढाकार घेत असून, त्यात आता माजी आमदार वसंत गीते यांचीही भर पडली आहे. बोगदा त्वरित सुरू करण्यासंदर्भात पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांना गीते व नगरसेविका वंदना शेवाळे, सुनीता मोटकरी यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. इंदिरानगरकडून गोविंदनगरकडे जाणाऱ्या बोगद्यामुळे उड्डाणपुलालगतच्या रस्त्यावर दुतर्फा वाहतूक कोंडी होऊ लागली होती. विशेषत: गोविंदनगरच्या बाजूकडील रस्त्यावर या बोगद्यामुळे वाहनांची रांग लागत होती. त्यामुळे काही अपघातही झाले. अपघात आणि वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून प्रशासनाने बोगदा सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच दोन्ही बाजूकडील वाहतुकीसाठी पर्याय उपलब्ध करून दिले. हा बोगदा बंद केल्यामुळे इंदिरानगरमधील वाहनधारकांची मोठय़ा प्रमाणावर गैरसोय झाली आहे. गोविंदनगरकडील सिटी सेंटर मॉलकडून येणाऱ्या रस्त्याच्या भूसंपादनप्रसंगी पालिकेने सुमारे ९० कोटी खर्च करून शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन केले. हा रस्ता उड्डाणपुलाखालील बोगदा बंद केल्याने इंदिरानगरला जोडला जाऊ शकत नाही. या सर्व रहदारीचा ताण मुंबई नाका चौकावर येत असून मुंबई नाका येथे शहरातील ११ रस्ते एकत्र येत असल्याने येथे वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या कोंडीमुळे लागलेल्या वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या वाहनांमुळे गडकरी चौक, सारडा सर्कल, द्वारका सर्कल, उंटवाडी या शहरातील मध्यवस्तीतील वाहतुकीवरही परिणाम होऊ लागला आहे. सदरचा बोगदा हा कुंभमेळ्याच्या वेळेस पर्वणीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला होता, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्या वेळेस नागरिकांना विश्वासात न घेता अचानक हा बोगदा बंद केल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत. बोगदा बंद करून साधारण: सहा ते आठ महिने झाले आहेत.
हा बोगदा सुरू करण्यासाठी आजपर्यंत अनेक प्रयत्न झाले आहेत. काही मंडळांनी स्वाक्षरी अभियानही राबविले, परंतु काहीही उपयोग झालेला नाही. बोगदा सुरू करण्यासाठी भाजप अधिक आक्रमक राहिला असून आ. प्रा. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे यांनी वेळोवेळी हा मुद्दा मांडला आहे. आता त्यात माजी आमदार वसंत गीते यांनी उडी घेतली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला अरुंद बोगद्याविषयी व इतर उपाययोजनांसंदर्भात जागृत करण्यात आले होते, असे गीते यांनी म्हटले आहे. या निर्णयामुळे भविष्यात संबंधित ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकेल, असा इशारा देण्यात आला होता. या इशाऱ्याची दखल प्रशासनाने घेतली नाही. बोगदा त्वरित सुरू न केल्यास परिसरातील नागरिकांच्या बैठका घेऊन तीव्र आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, असा इशारा गीते यांनी निवेदनात दिला आहे. शिष्टमंडळात नगरसेविका वंदना शेवाळे, सुनीता मोटकरी, दीपाली कुलकर्णी, माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे, सचिन कुलकर्णी, कर्नल आनंद देशपांडे, अविनाश बल्लाळ, हेमंत पाटील आदींचा समावेश होता.